साेमनाथ मंदिर केवळ मंदिर नसून, भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजाराे वर्षांच्या आक्रमणांनंतर साेमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे. हीच देशाच्या सनातन शक्तीची साक्ष आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. गुजरातेतील साेमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीस 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्रभास पाटण येथे विशेष महापूजेचे आयाेजन करण्यात आले हाेते. याच अनुषंगाने भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा जागर घडवणारा सांस्कृतिक साेहळा ‘साेमनाथ स्वाभिमान पर्व : अतूट आस्थेची 1000 वर्षे’ या विशेष भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात आयाेजन करण्यात आले हाेते.
यावेळी राज्यपाल बाेलत हाेते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार, राज्यपालांचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डाॅ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशाेक भन्साळे यांनीही महादेवाचे दर्शन घेतले.यानंतर मान्यवरांनी ‘साेमनाथ स्वाभिमान पर्व’ प्रदर्शनालाही भेट दिली. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर यांच्या नृत्याविष्काराने झाली.भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार त्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.