देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वाेच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कठीण काळात देशहिताला सर्वाेच्च प्राधान्य देत विभागीय खर्चांमध्ये संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अधिकाधिक बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेण्यात येणार असून, संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाणार आहे, असे अॅड. शेलार यांनी सांगितले. दरम्यान, कान चित्रपट महाेत्सवात सहभागी हाेणारे मराठी चित्रपट, तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय आणि सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियाेजित पद्धतीने कार्यरत राहतील. तसेच, मराठी चित्रपटांना प्राेत्साहनासाठी आवश्यकता असेल तेथे ऑनलाइन सहभागी हाेईन, असेही अॅड. शेलार यांनी सांगितले.