आत्मयाचे नाना गुण । ब्रह्म निर्विकारनिर्गुण ।।1।।

    13-May-2026
Total Views |
 
 

saint 
 
 
आत्म्याच्या अनेकविध गुणांचे वर्णन सांगताना श्रीसमर्थ म्हणतात की वेद, शास्त्रे आणि पुराणे यांचा अर्थ, बाह्यांतरी दृष्टीला न पडता मनाेमनी गुप्तपणे चालणारा परमार्थ आणि सर्वज्ञ झाल्यामुळे प्राप्त हाेणारे सामर्थ्य हे आत्म्याचेच गुण आहेत. परमार्थम ार्गातील प्रगतीवरून ठरणाऱ्या माणसाच्या बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध यामधूनही आत्माराम प्रगट हाेताे.शुद्ध विचारांची धारणा व ताे झाल्यानंतर इतरांना बाेध करण्याची प्रेरणासुद्धा आत्म्यामुळेच मिळते. जागृती, स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या या चारीही अवस्था आत्म्याच्याच असतात. प्रकृतीपुरुष, पिंड, ब्रह्मांड, अष्टदेह एवढेच नव्हे तर मूळमायासुद्धा आत्म्याचाच गुण आहे. परमात्मा आणि परमेश्वरी, जगदात्मा आणि जगदेश्वरी, महेश आणि माहेश्वरी हीसुद्धा आत्मरूपच आहेत. आदिशक्ती, शिवशक्ती, सर्वशक्ती आणि अनेक जिन्नसांची उत्पत्तीस्थिती आत्म्याच्या याेगानेच हाेते.
 
पूर्वपक्ष आणि सिद्धांत, संगीत, नाना विद्या, गायनकला हे प्रगट करण्याचे सामर्थ्य एका आत्म्याचेच आहे. अज्ञान, विपरीत ज्ञान व सत्य ज्ञान हा ज्ञानप्रवास आत्म्याचाच घडताे आणि शारीरिक किंवा मानसिक हालचालीतून व्यक्त हाेणारी असद्वृत्ती किंवा सद्वृत्ती आत्म्यामुळेच प्रगट हाेते. जेव्हा एखाद्या साधकाला अलिप्तपण प्राप्त झाले असे आपण म्हणताे तेव्हा ते सुद्धा त्याच्या देहाचे नसून आत्म्याचेच असते. तत्त्वशाेध, तत्त्वबाेध आणि सुस्पष्ट विचार आत्मशक्तीमुळेच घडतात. सर्व उपासनांची सिद्धी म्हणजे आत्मनिवेदन हाेय आणि तेसुद्धा आत्म्यामुळेच शक्य हाेते हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात - नाना ध्याने अनुसंधाने । नाना स्थिती नाना ज्ञाने । अनन्य आत्मनिवेदनें । गुण आत्मयाचे ।।24।। ध्यान, ज्ञान आणि अनुसंधान इतकेच नव्हे तर परब्रह्माशी अनन्यता प्राप्त करून देणारे अनुसंधान हेसुद्धा आत्म्यामुळेच घडते. सारांशाने पाहिले तर जेवढे जेवढे म्हणून सूक्ष्म जाणीवेचे प्रगटीकरण आहे ते आत्म रूपाचेच आहे.