नाशिक राेड, मनमाड, देवळाली स्थानकांचा कायापालट

    13-May-2026
Total Views |
 

nashik 
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कंबर कसली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ ते नाशिक राेडदरम्यान व्यापक ‘रियर विंडाे’ निरीक्षण करून कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या दाैऱ्यामुळे रेल्वे यंत्रणा कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पूर्णपणे ‘अ‍ॅक्शन माेड’मध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची हाेणारी अफाट गर्दी लक्षात घेता, मनमाड स्थानकावर प्रवाशांना थांबण्यासाठी प्रस्तावित ‘हाेल्डिंग एरिया’ आणि आरपीएफ चाैकीच्या बांधकामाची अग्रवाल यांनी बारकाईने पाहणी केली. भाविकांची सुरक्षा आणि सुविधांमध्ये काेणतीही तडजाेड न करता ही कामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी क्रू लाॅबी आणि रेल्वे हेल्थ युनिटला भेट देऊन कर्मचारी व प्रवाशांच्या साेयी-सुविधांचा आढावा घेतला.
 
निफाड, कसबेसुकेणे आणि खेरवाडीसारख्यछाेट्या; परंतु तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानकांवरही कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. या स्थानकांवर प्रवाशांची चढ-उतार सुलभ व्हावी आणि गर्दीचे नियंत्रण करताना काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरू असलेल्या कामांची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाशिक राेड आणि देवळाली स्थानकावरही प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाे च्च प्राधान्य देत, फलाटांचे विस्तारीकरण व पादचारी पुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसाेबत वरिष्ठ शाखा अधिकारी या दाैऱ्यात सहभागी हाेते. सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे सांगत अग्रवाल यांनी रेल्वेच्या संपूर्ण टीमला सतर्क राहण्याचे आदेश दिले. रेल्वे प्रशासनाच्या या नियाेजनामुळे आगामी कुंभमेळा भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुखकर हाेण्याची चिन्हे आहेत.