भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाची महाराष्ट्राची क्षमता

    13-May-2026
Total Views |
 

MH 
 
पायाभूत सुविधा, नावीन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित हाेणार आहे.या सर्व शक्तींचा सहयाेग साधणाऱ्या अर्थव्यवस्था भविष्याचे नेतृत्व करणार असल्याने ही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने आवश्यक इकाेसिस्टीम उभारत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून, त्यासाठीसर्व आघाड्यांवर जाणिवेने प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे यांनी दिली. संतुलित प्रादेशिक विकास हा केवळ सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर ताे आर्थिकदृष्ट्याही अत्यंत शहाणपणाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
काॅन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) आयाेजिलेल्या न्युअल बिझनेस समिटमध्ये व्हिजन फाॅर इंडिया100 परिसंवादात मुख्यमंत्री बाेलत हाेते. काॅन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित हाेते.भविष्यातील अर्थव्यवस्था महामार्ग, बंदरे, विमानतळ, डिजिटल नेटवर्क्स, संशाेधन प्रयाेगशाळा, स्टार्ट अप इकाेसिस्टम आणि विद्यापीठांवर उभी असेल. म्हणूनच महाराष्ट्रात अभूतपूर्व वेगाने गुंतवणूक हाेत असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, मेट्राेचे जाळे, औद्याेगिक काॅरिडाॅर, लाॅजिस्टिक इकाेसिस्टम, डिजिटल पायाभूत सुविधा आदी प्रकल्प एकत्रितपणे महाराष्ट्राचा आर्थिक भूगाेल बदलवत आहेत.
 
जेव्हा भूगाेल बदलताे, तेव्हा अर्थव्यवस्था बदलते. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठीची क्षमता एआय, सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रिक वाहने, प्रगत उत्पादने, स्वच्छ ऊर्जा, डेटा सेंटर्स, जागतिक क्षमता केंद्रे (ग्लाेबल कॅपॅबिलिटी सेंटर्स) आणि ‘डीप-टेक’ कल्पकतेवर आधारित असेल.या निकषावर महाराष्ट्र स्वतः ला या बदलाच्या केंद्रस्थानी स्थापित करत आहे. राज्य आशियातील सर्वांत महत्त्वाचा ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर काॅरिडाॅर’ म्हणून उदयास येत आहे. देशातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. इथले ऑटाेमाेटिव्ह क्षेत्र आता ‘नेक्स्ट-जनरेशन माेबिलिटी’मध्ये रूपांतरित हाेत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.