आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश

    13-May-2026
Total Views |
 
 

bhim 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले असून, त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही प्रत्येकाच्या जीवनात जाणवताे. पुढील पिढीपर्यंत बाबासाहेबांचा विचार पाेहाेचवणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डाॅ. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्कवर प्रथमच ड्राेन शाे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार अमित साटम, आमदार याेगेश सागर, आमदार प्रसाद लाड, आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन, महापाैर रितूतावडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, भन्ते डाॅ.राहुल बाेधी महाथेराे व माेठ्या संख्येने नागरिक उपस्थित हाेते.
 
ड्राेन शाे या अभिनव उपक्रमांतून नागरिकांना आकाशात बाबासाहेबांच्या कार्याचे नेत्रदीपक दर्शन घडले. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर देशभरासह जागतिक स्तरावर हाेत असून, अशा अभिनव उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पाेहाेचविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ड्राेन शाेद्वारे डाॅ.बाबासाहेबांना अनाेखे अभिवादन करण्यात आले. सुमारे 2000 ड्राेनच्या साहाय्याने आकाशात साकारण्यात आलेली प्रकाशचित्रे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. डाॅ.बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे यात उलगडण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व अधाेरेखित करणारी विलाेभनीय दृश्ये साकारण्यात आली.