जयपूरमधील शनिवारची एक गजबजलेली सकाळ. एका खासगी गुप्तहेराची हाेंडा अॅक्टिवा ब्रह्मपुरीच्या गल्ल्यांमधून इकडे-तिकडे वळणे घेत पुढे सरकत हाेती. तिचे गंतव्य स्थान हाेते जाेहरी बाजार. नुकताच विवाह ठरलेली एक भावी वधू तिथे एका कृत्रिम दागिन्यांच्या दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करत हाेती. या गुप्तहेराचा एक सहायक गेल्या दाेन आठवड्यांपासून त्या दुकानात मदतनीस असल्याचे भासवून गुप्तपणे त्या तरुणीवर पाळत ठेवून हाेता. त्या तरुणीला सतत काेणाचा तरी फाेन येत हाेता. अगदी हळू आवाजात ती फाेनवर विनवत हाेती, कामावर आहे, आता नाही बाेलता येणार. दुकानाच्या समाेरच्या हाॅटेलमध्ये भरपेट खाऊन झाल्यावर त्या डिटेक्टिव्हला पुढचे काम हाेते, आमेर किल्ल्याजवळ पन्ना मीना का कुंड येथे जाणे. तेथे ती तरुणी प्रत्येक शनिवारी काेणाला तरी गुप्तपणे भेटायची.डिटेक्टिव्हसुद्धा तेथे जाऊन गाईड असल्याचे दर्शवत तिच्याजवळ घुटमळू लागला. गेले कित्येक आठवडे हे असेच चालू हाेते.
अखेर त्या डिटेक्टिव्हने त्याचा अहवाल दिला. लपवलेले नाते, दडवून ठेवलेली धूम्रपानाची सवय आणि चुकीच्या पद्धतीने सादर केलेला काैटुंबिक व्यवसाय.खरेतर असे म्हटले जाते, की काेणतेही नाते विश्वासाच्या पायावर उभे असते. हा पाया जितका जास्त मजबूत, म्हणजे विश्वास जितका दृढ, तितके ते नाते चिरकाल टिकते. आणि विवाहातून निर्माण हाेणाऱ्या नात्यात तर हे आणखीच खरे ठरते. कारण प्रेमविवाहा खेरीज, ठरवून केलेल्या विवाहात वर आणि वधू, या दाेघांनाही परस्परांची आणि परस्परांच्या कुटुंबांची माहिती नसते. आणि विवाहानंतर मुलीने सासरच्या घरी जाण्याची सार्वत्रिक प्रथा आहे. अशा वेळी मुलीच्या काळजीतून मुलीचे पालक आजूबाजूने मुलाची चाैकशी करायचे. नंतर काही काळापूर्वी डिटेक्टिव्हची मदत घेऊन भावी वराचा तपास करण्याची प्रथा मूळ धरू लागली. त्याची व्यसने, प्रकरणे, बाह्य संबंध आणि आर्थिक स्थिती असे, विवाहानंतर मुलीला त्रासदायक ठरू शकतील असे सगळे घटक आधीच तपासले जाऊ लागले.
आता तर भावी वधूची चाैकशी अशा गुप्त पद्धतीने केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, मेरठ ड्रम सिमेंट हत्या आणि राजा रघुवंशी हनिमून हत्या अशी काही हाय-प्राेफाईल प्रकरणे साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणावर गाजल्यानंतर तपासाचे लक्ष आता वधूंवरही केंद्रित झाले आहे. यात ताे विश्वास हळूच काेठे निघून गेला, काेणाला कळलेच नाही.वैवाहिक प्रकरणांत भावी वधूची चाैकशी करण्याच्या प्रकरणांचे प्रमाण 80% असते, असे एका खासगी डिटेक्टिव्हने सांगितले. आणि हे लाेण केवळ मेट्राे सिटी, म्हणजे महानगरांत नाही. लहान शहरांतही पसरले आहे. वर्षभरात आम्ही केवळ लहान शहरांतून आलेली भावी वधूंच्या चाैकशीची साधारण पाचशे प्रकरणे हाताळताे, असे 2009 पासून या क्षेत्रात काम करणारे डिटेक्टिव्ह सुभाष चाैधरी सांगतात. वधूंचीच चाैकशी का? आणि ती आत्ताच का सुरू झाली?
भावी वधूंची चाैकशी करण्याची पद्धत हवेतून आपाेआप आलेली नाही. त्याला काही विशिष्ट पार्श्वभूमी आहे. पहिला मुद्दा म्हणजे गुन्ह्यांच्या काही प्रकरणांनी सर्वसामान्य माणूस हादरून गेलेला आहे. असे काही एखादे प्रकरण पुन्हा उघडकीला आले, की आमच्याकडे विचारणा करणारांची संख्या काही पटींनी वाढते, असे डिटेक्टिव्ह प्रवीण सांगतात.दुसरे असे की गेल्या काही वर्षांत सामाजिक वीण पूर्णपणे उसवली गेली आहे. आणि कुटुंब व्यवस्थेतही आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत हाेती. तेंव्हा गावातला प्रत्येक जण गावातल्या प्रत्येकाला ओळखायचा.प्रत्येकाचे सुखदुःख प्रत्येकाला माहीत असायचे. शक्य ताेवर ते आपसात वाटून घेण्याचाही त्या सगळ्यांचाच प्रयत्न असायचा. त्या गावात सहज पारावर बसून बाेलता बाेलता सुद्धा काेणालाही काेणाचीही सगळी माहिती विनासायास मिळून जायची. मुलीच्या वडिलांचे काम हाेऊन जायचे.
आता शहरांत आणि महानगरांत वर्षानुवर्षे शेजारी राहणाऱ्या माणसाचेही नाव माहीत नसते. दाेन किंवा तीन माणसांचे ते छाेटेसे एकल कुटुंब घरातही एकटेच असते, साेसायटीतही एकटेच असते आणि त्या महानगरात तर अशी एकटी एकटी पडलेली, मुळे राेवता न आलेली असंख्य माणसे शेवरीच्या कापसाच्या म्हातारीसारखी इकडेतिकडे तरंगत असतात. अशा वातावरणात कुणाची चाैकशी करायची तर काेणाकडे करणार, आणि कशी करणार? अशा प्रकरणांत, खासगी बाब म्हणून पाेलीससुद्धा काही करू शकत नाहीत. अशा वेळी पालकांना आधार उरताे ताे फक्त खासगी गुप्तहेरांचा, असे संजय या दिल्ली येथील डिटेक्टिव्हने सांगितले.संवादातील दरी किंवा संवादाचा अभाव, असेही कारण त्यांनी दिले आहे. विवाह विषयक अॅप्स आणि साेशल मीडिया प्राेफाईलने मुलांना आणि मुलींचेही अधिक पर्याय उपलब्ध करून दिले, हे खरेच आहे.
पण बनावट ओळखी, नाेकरी किंवा उत्पन्नाबाबत अतिशयाेक्तीपूर्ण दावे आणि फसवणूक यालाही त्यात मुक्तद्वार मिळाले. आणि आजच्या काळातील व्यवहारी पिढी गृहीतकांवर नाही, तर पडताळणीवर अधिक विश्वास ठेवते, असे अनुभव तान्या पुरी या खासगी डिटेक्टिव्ह सांगतात. पूर्वी कुटुंबे प्रामुख्याने वरांची तपासणी करत असत. आता वधूंचीही तितकीच कसून तपासणी केली जाते. णाऱ्या वधूंचा पर्दाफाश केला आहे, असे त्या म्हणाल्या. एका प्रकरणात त्या वधूचे संपूर्ण कुटुंब म्हणजेच एक माेठी फसवणूक निष्पन्न झाली. अगदी चित्रपटातील फसवणुकीच्या धर्तीवर त्या कुटुंबातील आई, वडील, भावंडे यांचा वास्तव जीवनात परस्परांशी काहीही संबंध नव्हता. त्या मुलीशी तर त्याहून नव्हता. विवाह विषयक अॅप्सवर खाेटी माहिती देऊन ते विवाहेच्छु तरुणांना फसवत असत. अशाच प्रकारे खाेटी माहिती देऊन विवाह केल्याच्या आणि विवाहानंतर दाेन तीन दिवसांत घरातील माेठी रक्कम आणि सगळे दागिने घेऊन गायब झालेल्या नववधूच्या बातम्या आजकाल नव्या राहिल्या नाहीत.
किंवा मग विवाह निश्चित करायचा, विवाहापूर्वी भावी वराच्या कुटुंबीयांकडून हाैसेने काही नवे किंवा घरातील पारंपरिक दागिने, घरातील नवी सून म्हणून त्या मुलीच्या अंगावर घातले जातात, ते घ्यायचे आणि विवाहाच्या काही काळ आधी काही तरी कारण देऊन विवाह रद्द करायचा किंवा सरळ गायब व्हायचे. असे प्रकार हल्ली खूप वाढू लागले आहेत.विवाह ठरवून देण्यासाठी, म्हणजे विवाहासाठी मुलगी सुचवण्यासाठी लाखाे रुपये घेतले आणि माेजले जातात. त्यामुळे या विवाहाच्या बाजारात आता विश्वास नाही, केवळ व्यवहार राहिला आहे.काेणत्याही प्रकारे फसवणूक हाेणे, हेच मुळात आत्यंतिक वेदनादायी असते. त्यात वैयक्तिक, काैटुंबिक, सामाजिक उपाययाेजना म्हणून विवाह करू पाहणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था अशा फसवणुकीनंतर अगदीच केविलवाणी हाेत असेल. यावर उपाय म्हणजे सध्या माेबाइल आणि साेशल मीडिया यांच्या अतिरिक्त आहारी जाऊन माणसे माणसांपासून दुरावत चालली आहेत, ते थांबवणे.
मी, मला, माझे, असे आत्मकेंद्रित जीवन आले आहे, ते जाणीवपूर्वक बहुमुखी बनवणे.सामाजिक नातेसंबंधांची उसवलेली वीण जाणीवपूर्वक पुन्हा बांधणे. आपल्याकडे केवळ पैसे असून चालत नाही, वेळेला माणसे सुद्धा लागतात, याचे भान ठेवून त्या स्वार्थासाठी का हाेईना, मी माझ्यासाठी कमावताे, हा विचार बाजूला ठेवून इतरांच्या वेळेला इतरांना मदत करणे. आज हे उपाय अवघड वाटतील.पण, एके काळी आपले सगळे पूर्वज याच प्रकारे जगत हाेते, हे लक्षात घेतले तर ते इतके अवघड वाटणार नाही. थाेडक्यात म्हणजे आपण एकटे जगू शकत नाही, आपण समाजाचा भाग आहाेत, याचे भान येणे. म्हणजे माणसात येणे.