महावितरणचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व

    12-May-2026
Total Views |
 
 


sports
एमएसईबी हाेल्डिंग कंपनीने आयाेजिलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला पुरुष गटातील कबड्डी व खाे-खाे, तसेच कुस्तीत महावितरणने चार सांघिक विजेतेपदे व एक उपविजेतेपद मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले. दरम्यान, महावितरणच्या कबड्डी पुरुष संघाने बलाढ्य हिमाचल प्रदेश संघाचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करीत 15 वर्षांनंतर विजेतेपदाचा मान मिळवला.या राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्राने गाैरवण्यात आले. संचालक (प्रकल्प) दत्तात्रेय पडळकर (महापारेषण), काेकणचसहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (महावितरण), स्पर्धेच्या आयाेजन समितीचे अध्यक्ष व पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे (महावितरण), मुख्य अभियंते सर्वश्री अनिल काेलप, दत्तात्रेय बनसाेडे, धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, अंकुर कावळे, संजय पाटील, संजय कुऱ्हाडे, मुख्य औद्याेगिक संबंध अधिकारी संजय ढाेके व पुरुषाेत्तम वारजुरकर, विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय,सरचिटणीस नरेश कुमार, खजिनदार ललित गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे व सर्व खेळाडू यावेळी उपस्थित हाेते.
 
दरम्यान, मागील वर्षीचा विजेता हिमाचल प्रदेश विरुद्ध महावितरण संघ यंदाही आमनेसामने आला. दाेन्ही संघांत राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असल्याने अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली हाेती.सामन्याच्या पहिल्या पाच ते सात मिनिटांत हमाचलच्या संघाने आक्रमक चढाईवर भर देत 6 विरुद्ध 2 अशी आघाडी घेतली. सर्व गडी बाद झाल्यानंतर काेर्टात एकमेव असलेल्या महावितरणच्या नीलेश ठाकूरने आक्रमक चढाईत हिमाचलच्या दाेन खेळाडूंना बाद केले, तर लगेचच विराेधी चढाई करणारा हिमाचलचा मातब्बर रामगाेपालला महावितरणच्या तीन बचावपटूंनी बाद केले आणि याच ठिकाणी सामना फिरला.अखेर महावितरणने 34 विरुद्ध 24 गुणांनी बलाढ्य हिमाचलवर मात केली व या राष्ट्रीय स्पर्धेत 15 वर्षांनंतर कबड्डीमध्ये विजेतेपद मिळवले. कबड्डीच्या महिला गटातही महावितरण विरुद्ध हिमाचल अशी लढत झाली. मात्र, हिमाचल प्रदेशने सुरवातीला घेतलेली आघाडी कायम ठेवत महावितरणचा 21 विरुद्ध 12 गुणांनी पराभव केला. त्यामुळे महावितरणच्या महिला कबड्डी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.