मध्य रेल्वेने नव्याने अधिसूचित केलेल्या इगतपुरी गुड्स शेडमधून वाहनांची पहिली लाेडिंग यशस्वीरित्या सुरू केली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामुळे आता नाशिकमधून थेट देशाच्या इतर भागांत वाहनांची वाहतूक करणे अधिक साेपे आणि जलद झाले आहे.
या महत्त्वपूर्ण सेवेसाठी पहिली मागणी ट्रान्सपाेर्ट काॅर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (टीसीआय) नाेंदवली. या उपक्रमामुळे या भागातील लाॅजिस्टिकल कार्यक्षमतेत नवा अध्याय सुरू झाला आहे. वाहनांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी खास तयार केलेल्या 25 एनएमजी (न्यू माॅडिफाइड गुड्स) वॅगनमध्ये एकूण 100 गाड्या वाहतुकीसाठी लाेड करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या लाेड केलेल्या वाहनांमध्ये नाशिकमधील महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रकल्पातून आणलेल्या विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे.
उत्तर पूर्व रेल्वेच्या नाैतनवा गुड्सटर्मिनलकडे रवाना हाेणाऱ्या या रेकमधून प्रति रेक अंदाजे 17 लाख 16 हजार 750 रुपयांचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजाेरीत जमा झाला आहे. ‘गती शक्ती’ या संकल्पनेंतर्गत, मध्य रेल्वेचा मुंबई विभाग आपला मालवाहतुकीचा वाटा वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन वस्तू आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहे. इगतपुरी गुड्स शेडचा ऑटाेमाेबाइल लाेडिंगसाठी वापर केल्यामुळे नाशिकमधील उत्पादकांसाठी अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित लाेडिंग पाॅईंट उपलब्ध झाला आहे.
यामुळे उत्पादकांच्या लीड टाईम्स आणि लाॅजिस्टिकल खर्चात बचत हाेणार आहे.ऑटाेमाेबाईल लाेडिंगसाठी इगतपुरी गुड्स शेडची अधिसूचना मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीच्या क्षेत्रात विविधता आणण्याच्या आणि वाहन उद्याेगासाठी संपूर्ण उपाययाेजना (एंड- टू-एंड साेल्यूशन्स) पुरवण्याच्या चालू प्रयत्नांचाच एक भाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्निल निला यांनी हा उपक्रम मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीला एक नवी, उज्ज्वल दिशा देणारा आणि ऑटाेमाेबाइल क्षेत्रासाठी वरदान ठरणार असल्याचे म्हटले आहे