केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025’मध्ये महाराष्ट्राने आपल्या यशाच्या पाऊलखुणा उमटवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये राज्यातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दाेन महत्त्वाच्या गटांत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्कारांचे वितरण 3 जूनला दिल्लीत विशेष साेहळ्यात हाेणार आहे.भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावून 1 काेटींचे पारिताेषिक मिळवले आहे. ही कामगिरी राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी आणि शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे, कारण बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव देशासाठी आदर्श ठरले आहे.
रायगड जिल्ह्यातील खारीवली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 काेटींचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.राज्याने द्वितीय श्रेणीतील पुरस्कारांवरही वर्चस्वराखले आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासनासाठी ‘सुशासन’ श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवून 75 लाखांचे पारिताेषिक मिळवले आहे. तसेच, रायगड जिल्ह्यातील चांभारली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ या विषयात देशात द्वितीय स्थान मिळवत 37.5 लाखांचा सन्मान मिळवला आहे.हे पुरस्कार ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ आणि ‘नानाजी देशमुख सर्वाेत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’, अशा दाेन प्रमुख श्रेणींत दिले जातात. गरिबी निर्मूलन, आराेग्य, सुशासन आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या 9 प्रमुख संकल्पनांवर आधारित कामगिरीचे मूल्यमापन ‘पंचायत प्रगती निर्देशांक’नुसार करण्यात आले आहे.