महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला सर्वाेत्कृष्ट कामांबद्दल आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फाॅर स्टॅण्डर्डायझेशन) नामांकन मिळाले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभागाने हे यश मिळवले आहे.आयएसओ नामांकन मिळवणारा महापारेषणचा जनसंपर्क विभाग राज्यात पहिलाच ठरला आहे.महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. ‘महापारेषण समाचार’ या गृहमासिकेत क्यू-आर काेड, पाॅडकास्ट आणि डिजिटल संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती सादरीकरणाला आधुनिक रूप दिले आहे. जाहिराती आणि जनजागृती माेहिमांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणारा हा विभाग राज्यातील अग्रगण्य विभाग म्हणून ओळखला जाताे.
विशेष म्हणजे जनसंपर्क क्षेत्रात 15 पुरस्कार पटकावण्याचा विक्रमही महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने आपल्या नावावर केला आहे. आयएसओ नामांकनामुळे महापारेषणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राेवला गेला आहे. महापारेषणच्या जनसंपर्क विभागाचे आयएसओ नामांकनचे प्रमाणपत्र लेखानिबंधक विजयकुमार स्वामी यांनी भिकाने यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजू गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डाॅ. मिलिंद आवताडे, जनसंपर्क विभागाचे श्रीकांत जाधव उपस्थित हाेते.डाॅ. संजीव कुमार यांनी यशाचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने हाेणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. विशेषतः साेशल मीडियाद्वारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम, थ्रेडस) जनसंपर्क विभागाने महापारेषणची भूमिका नागरिकांसमाेर सकारात्मकपणे व ठळकपणे मांडली. भविष्यातही महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण अभिनव कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.