विकासाबाबत नाशिक आता थांबणार नाही : मुख्यमंत्री

    12-May-2026
Total Views |
 

CM 
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्राेथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. क्षमता आणि सुविधांद्वारे येथील औद्याेगिक विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.‘कुंभ उद्याेग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषदे’च्या समाराेप सत्रात मुख्यमंत्री बाेलत हाेते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्याेग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्राेद्याेग मंत्री संजय सावकारे, खासदार शाेभा बच्छाव, महापाैर हिमगाैरी आहेरआडके, विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, उद्याेग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह यांच्यासह उद्याेजक व गंतवणूकदार यावेळी उपस्थित हाेते.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध 300 हून अधिक उद्याेजकांसाेबत 13190 काेटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 32 हजार राेजगारनिर्मिती हाेणार आहे.
 
कुंभमेळासाठी राज्य शासन 33 हजार काेटींची गुंतवणूक करत आहे.ही गुंतवणूक पुढील 15-20 वर्ष उद्याेगासाठी मॅग्नेटचे काम करेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, की यामुळे निर्माण झालेल्या दळणवळण सुविधा, ड्राय पाेर्ट, पायाभूत सुविधा, रिंग राेड आदी सुविधांमुळे पुढील 10 वर्षांत 3 लाख काेटींची अर्थव्यवस्था नाशिक जिल्ह्यात तयार हाेईल.गाेदावरी शुद्धीकरण, पर्यावरण रक्षण, जलशुद्धीकरण याकडे लक्ष आहे. कुंभ अधिक सुगम कसा हाेईल याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले मैत्री कक्षाच्या माध्यमातून उद्याेजकांचे प्रश्न साेडवण्यात येत आहेत. या कक्षाकडे प्राप्त अर्जांपैकी 99 टक्के अर्ज मार्गी लावले आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, राजूर बहुला, मनमाड आदी ठिकाणी एमआयडीसी साकारण्यात येणार आहे.त्यासाठी 1300 एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. डाॅ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील विकास कामांची माहिती दिली.