एज्युसिटीसाठी करंजाडेत 100 हेक्टर जमीन शासनाकडून निश्चित

    12-May-2026
Total Views |
 

CIDKO 
 
परदेशातील नामांकित विद्यापीठांचे कॅम्पस एकाच ठिकाणी उभारण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘एज्युसिटी’ प्रकल्पाला गती मिळाली असून, करंजाडेत 100 हेक्टर जागेवर या प्रकल्पाची आखणी सुरू झाली आहे. ‘एज्युसिटी’साठी सिडकाेने करंजाडेतील जमीन निश्चित केली आहे.यापूर्वी कुंडेवहाळ गावाजवळील जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे नियाेजन हाेते. मात्र, करंजाडेतील जमीन सपाट आणि विकासास अनुकूल असल्याने तेथे पायाभूत सुविधा उभारणे साेपे जाईल, या कारणास्तव अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती सिडकाेकडून देण्यात आली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत उभारला जाणार आहे.
 
त्यामुळे करंजाडे आणि पुष्पकनाेड परिसराचे महत्त्व वाढणार आहे. सिडकाेने मागीलवर्षी मुंबईत झालेल्या भव्य कार्यक्रमात अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, याॅर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनाॅय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाेलाॅजी आणि इन्स्टिट्यूटाे युराेपिओ दी डिझाईन या पाच विद्यापीठांना इरादापत्रे दिली आहेत. प्रत्येक विद्यापीठाला सुमारे 10 एकर जागा देण्यात येणार असून, सिडकाे रस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार काेटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याच्या परिसरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यावर भर आहे. सिडकाेचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना एज्युसिटी, मेडिसिटी व इंटिग्रेटेड लाॅजिस्टिक पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी जागा माेकळी करण्यावर लक्ष दिले जाणार आहे.