ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाचा सुगंध, कष्टकरी माऊलींच्या हाताची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाेड यांचा अभूतपूर्व महाेत्सव वाशीत पार पडला. 24 मार्चपासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-2026’ प्रदर्शनाने निराेप घेताना यशाचे सर्व विक्रम माेडीत काढले. 13 दिवसांत 22 काेटींची विक्रमी विक्री करून ग्रामीण महिलांनी सिडकाे एक्झिबिशन सेंटरमध्ये उद्याेजकतेचा नवा इतिहास लिहिला.मुंबईकरांनी 490 स्टाॅल्सवर दाखवलेला हा उदंड प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नव्हता, तर ताे ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेला भ्नकम आधार ठरला. शेवटचे सहा दिवस तर प्रदर्शनात जनसागर लाेटला. त्यामुळे आयाेजकांनाही प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला.
यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वांत माेठे गेमचेंजर ठरले ते म्हणजे आयाेजकांच्या नाविन्यपूर्ण सुविधा. 25 कि.मीच्या परिघात माेफत घरपाेच सेवा देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. आमच्या हातात पिशव्यांचे ओझे नकाे, असे म्हणणाऱ्या मुंबईकरांनी या सुविधेमुळे धान्य, मसाले, सेंद्रिय गूळ आणि हस्तकलेच्या वस्तूंची मनमुराद खरेदी केली. घरपाेच सुविधेमुळे खरेदीचा वेग वाढला आणि उलाढालीने 10 काेटींचा टप्पा ओलांडून थेट 22 काेटींवर झेप घेतली. 25 कि.मीच्या परिघात घरापर्यंत साहित्य पाेहाेचवण्याची जबाबदारी ‘उमेद’ने यशस्वीपणे पेलली.खरेदीच्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची गैरसाेय टाळण्यासाठी विशेष विश्रांती कक्षाची साेय हाेती. कुटुंबीय खरेदी करत असताना ज्येष्ठांना तेथे सुरक्षित बसता येत हाेते. या संवेदनशील निर्णयाचे सर्वत्र काैतुक झाले. या प्रदर्शनात सहभागी स्टाॅलधारक महिलांना समाराेप सत्रात विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले.