मेन्यू लहान, तितके रेस्टाॅरंट उत्तम!

    09-Apr-2026
Total Views |
 
 
 

hotel 
परदेश पर्यटनात कुठे, काय, कसं खायचं हा एक माेठा ताप असताे. बरीचशी माणसं टूर कंपन्यांबराेबर जातात आणि त्या कंपन्या ग्राहकांना इंडियन रेस्टाॅरंटमध्येच नेतात. देश बदलला तरी त्यांच्या खानपानात काहीच फरक पडत नाही. आपण स्वित्झर्लंडमध्ये कुठल्या तरी शिखरावर वडापाव किंवा पावभाजी खाल्ली, हाच यांच्यासाठी सर्वाेच्च सुखाचा बिंदू.जिथे जाऊ तिथल्या संस्कृतीचा, खानपानाचा आस्वाद घेऊ असा विचार करून स्वच्छंद भटकंती करणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. मात्र, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध ठिकाणी कुठे खायचं, हा प्रश्न पडताे. तिथे टुरिस्टांसाठीचे ट्रॅप बनलेली अनेक रेस्टाॅरंट असतात.तिथे ना चांगलं अन्न मिळतं, ना ती स्वस्त असतात.
 
अशी रेस्टाॅरंट ओळखायची कशी? जिथे खूप जत्रा लाेटलेली असते टुरिस्टांची, ते रेस्टाॅरंट टाळावं. तिथे एखादा माणूस उभा राहून इकडे या, आमच्याकडचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ खा, असं आवतण देत असताे.याचे खाद्यपदार्थ प्रसिद्ध असतील, त्यांना असा माणूस नेमावा लागेल का लाेकांना बाेलावण्यासाठी? अशा ठिकाणी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना हवं ते खाता यावं यासाठी भलामाेठा मेन्यू असताे. ही एक खूण असते रेस्टाॅरंट बंडल असण्याची. त्यापेक्षा स्थानिकांना विचारावं आणि एखाद्या कमी गर्दीच्या आणि छाेटा मेन्यू असलेल्या ठिकाणी खावं, ते स्वस्त आणि मस्त असतं.