इलेक्ट्रिकल काॅन्ट्रॅक्टर्स असाेसिएशन ऑफ महाराष्ट्रने (इकॅम) बाॅम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-2026’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयाेजन केले आहे.यात महावितरणच्या प्रदर्शनाला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट देत विविध याेजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.नाईक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्युत कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्युत क्षेत्राच्या माध्यमातून प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन नाईक यांनी केले. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी ऊर्जा क्षेत्रात राज्याने घेतलेल्या आघाडीबाबत माहिती दिली.
नाईक यांनी महावितरणच्या दालनाला भेट दिली आणि विविध याेजना, उपक्रमांची माहिती घेत काैतुक केले. पवार यांनी नाईक यांचे स्वागत केले. यावेळी विशेष कार्य अधिकारी सुधन्वा पत्की (नवी दिल्ली), इकॅमचे अध्यक्ष देवांग ठाकूर, सरचिटणीस अमरनाथ पाटील आदी उपस्थित हाेते. या प्रदर्शनात महावितरणचे मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार आणि विद्युत सुरक्षा माेहिमेचे समन्वयक डाॅ.संताेष पाटणी यांनी विद्युत सुरक्षेबाबत प्रबाेधन केले. महावितरणच्या अभियानात सहभागी हाेत ग्राहक संवादाद्वारे विद्युत सुरक्षेचा जागर करण्याची ग्वाही यावेळी इकॅमने दिली.