झिराेधा, फार्मर्स फाॅर फाॅरेस्टशी वन विभागाचा करार; मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडाेबातील प्रकल्पाला चालना

    09-Apr-2026
Total Views |
 

agree 
जैवविविधतेने समृद्ध अशा ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यासाठी राज्याच्या वन विभागाने झिराेधा कंपनी व संवर्धन भागीदार फार्मर्स फाॅर फाॅरेस्ट या संस्थांबराेबर सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राेत्साहन आणि पाठबळामुळे हा प्रकल्प साकारणार असून, दीर्घकालीन पर्यावरण पुनरुज्जीवन आणि हवामान लवचिकतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. हा उपक्रम संरक्षित अरण्ये, सामुदायिक जमीन, शेतीक्षेत्र, गवताळ प्रदेश आणि जलस्राेत अशा विविध भूप्रकारांचा एकत्रित विचार करणारा राज्यातील पहिलाच सर्वसमावेशक लँडस्केप प्रकल्प ठरणार आहे. प्रत्येक भूप्रकारानुसार शास्त्रीय पद्धतीने आखलेल्या उपाययाेजना राबवून परिसंस्थेचे पुनरुज्जीवन, जैवविविधतेत वाढ आणि मानव वन्यजीवसह अस्तित्व मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. वाघांच्या संख्येतील वाढ आणि बफर क्षेत्रातील मानवी वस्तीमुळे मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत आहे; तसेच विकासामुळे अधिवास तुकड्यांत विभागले जाण्याची समस्या निर्माण हाेत आहे. त्यामुळे एकात्मिक उपक्रमांची गरज अधाेरेखित झाली आहे.