दाजिपूर अभयारण्यात आता नव्या वाघाचा वावर; सह्याद्री दऱ्याखाेऱ्यात ‘रायबा’ नव्या वाघाची डरकाळी

    08-Apr-2026
Total Views |
 
 

vagh 
 
सह्याद्रीच्या दऱ्याखाेऱ्या आता ‘रायबा’ या नव्या वाघाची डरकाळी ऐकू येऊ लागली आहे.येथील दाजिपूर अभयारण्यात काही महिन्यांपासून वावरणाऱ्या रायबाचे छायाचित्र ट्रॅप कॅमेरात चित्रीत झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिवसेंदिवस नवनव्या वाघांची भर पडते आहे. आतापर्यंत सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी व शिलेदार या वाघांची नाेंद झाली हाेती. आता रायबाचे दर्शन घडले आहे. तीन ते चार वर्षे वयाचा हा वाघ सुदृढ आहे.यापूर्वी ताे वन विभागाच्या अभिलेखांमध्ये नाेंदला गेलेला नव्हता. इंडिया टायगर एस्टिमेशनमध्ये त्याची उपस्थिती सूचित झाली हाेती. गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रथम ताे ट्रॅप कॅमेऱ्यात चित्रित झाला हाेता. या वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेची तुलना काेकण कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघांशी करण्यात आली हाेती. त्यामध्ये साम्य आढळले नव्हते. त्यामुळे हा वाघ नवा असल्याचे दिसून आले.
 
राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे व्यवस्थापन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे येते. याचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी या वाघाला एसटीआर टी 0-7 हा सांकेतिक क्रमांक दिला आहे. स्थानिकांनी या वाघाचे ‘रायबा’ असे नामकरण केले आहे.या वाघाच्या उपस्थितीमुळे राधानगरी अभयारण्याचे महत्त्व वाढीस लागणार आहे. गव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्याचे क्षेत्रफळ 351 चाैरस कि.मीचे आहे. सह्याद्री काेकण वन्यजीव भ्रमण मार्गातील हा महत्त्वाचा भाग आहे. कर्नाटकाकडून येणारे, तिलारी, आंबाेली मार्गे स्थलांतरीत हाेणारे वाघ राधानगरी अभयारण्यात काही काळ थांबून पुढे उत्तरेकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने जात असल्याच्या नाेंदी आहेत. अलीकडे रायबाचे दर्शन झाले असले तरी याच अभयारण्यात यापूर्वी सुभेदाराचा मु्नकाम वर्षभर हाेता, असे वन विभागाच्या कॅमेऱ्यात नाेंदले गेले. त्यामुळे गव्यांबराेबर राधानगरी अभयारण्य वाघांचेही म्हणून ओळखले जाण्याची चिन्हे आहेत.