ठाणे जिल्ह्यातील यंत्रणांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

    08-Apr-2026
Total Views |
 

Thane 
 
आपत्ती काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासारख्या (एनडीआरएफ) यंत्रणांसाेबत समन्वय कसा ठेवावा, अत्याधुनिक उपकरणांचा वापर कसा करावा आणि बचावकार्य अधिक वेगाने कसे करावे, याचे प्रत्यक्ष ज्ञान स्थानिक यंत्रणांना देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून विशेष माेहीम राबवण्यात येत आहे. या माेहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) अधिकारी स्थानिक यंत्रणांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करणार असून, यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम हाेणार आहे.नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असून, यासाठीच ठाणे जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. ठाणे जिल्हाधिकारी; तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम आयाेजिला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हा कार्यक्रम हाेत असून, प्रत्येक सत्रात 200 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
 
ाष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संयु्नत विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.या दाेन्ही दलांचे एकूण 25 अनुभवी अधिकारी; तसेच कर्मचारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ही तुकडी जिल्ह्यातील विविध महापालिका क्षेत्रांत आणि ग्रामीण भागात जाऊन स्थानिक यंत्रणेला प्रशिक्षित करणार आहे.या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डाॅ. अनिता जवंजाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदारही सहभागी झाले आहेत. केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर स्थानिक स्वयंसेवक, नागरी संरक्षण दल, पाेलीस पाटील आणि आपदा मित्र-सखी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी धावून जाणाऱ्या स्थानिक मदतीला तांत्रिक ज्ञानाची जाेड मिळणार आहे.