चिपी-मुंबई हवाई प्रवासासाठी 8 काेटींचा निधी

    08-Apr-2026
Total Views |
 
 

mumbai 
 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ ते मुंबईपर्यंतच्या हवाई प्रवासासाठी विमान परिचालक कंपनीला 7 काेटी 64 लाखांचा व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला. असा निधी देण्याचा निर्णय 17 मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हाेता.चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी अशी हवाई सेवा देणाऱ्या मे. जस्ट उडाे एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला प्रतिआसन 2991 रुपये याप्रमाणे एकूण 7 काेटी 64 लाख 20 हजार 50 रुपये मिळणार आहेत. प्रस्तुत हवाई मार्गाचा कालावधी चिपी विमानतळावरून चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी अशी प्रत्यक्ष विमानसेवा सुरू हाेईल त्या तारखेपासूनएक वर्षाचा राहील. त्याला मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडावा यासाठी केंद्राने 2016 मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम सुरू केली. त्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि विमानतळ प्राधिकरणात करार करण्यात आला आहे. या करारात नाशिक, जळगाव, गाेंदिया, अमरावती, नांदेड, साेलापूर, काेल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विमानतळांचा समावेश आहे.यापूर्वी सरकारने साेलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी 100 ट्नके व्यवहार्यता तफावत निधी देण्यास मान्यता दिली आहे.