राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, मुंबईकर प्रवाशांनी आता आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित लाेकलला माेठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लाेकल सेवेतून मार्चमध्ये 37 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नाेंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत यात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सामान्य लाेकलमधील प्रवास अधिक त्रासदायक हाेत असताना वातानुकूलित लाेकलच्या पर्यायाला अधिक पसंती मिळत आहे.मध्य रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वातानुकूलित लाेकलला माेठा प्रतिसाद मिळत आहे.
कार्यालयीन वेळेत प्रवास करणारे नाेकरदार, व्यावसायिक; तसेच विद्यार्थ्यांचा वातानुकूलित लाेकलकडे कल वाढला आहे.वातानुकूलित लाेकलचे भाडे सामान्य लाेकलच्या तुलनेत अधिक असले तरी प्रवाशांना मिळणारा आराम, वेळेची बचत आणि प्रवासातील सुरक्षिततेमुळे अनेकजण जादा खर्च करूनही वातानुकूलित लाेकलचा पर्याय निवडत आहेत. विशेषतः दीर्घ अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अधिक साेयीची ठरत आहे.मध्य रेल्वेवर डिसेंबर 2025 मध्ये 5 लाख 77 हजार तिकीट विक्री झाली.मार्चमध्ये हीच संख्या 6 लाख 87 हजारांवर गेली आणि 37 लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला 15.48 काेटींहून अधिक महसूल मिळाला. आता रेल्वे प्रशासन या सेवेचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.