हा कुत्रा साेशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. ज्या काळात लाेक एकमेकांना गंमतीशीर फाेटाेंचे ईमेल पाठवायचे, त्या काळापासून ताे आंतरजालात फिरताे आहे. त्याचा पराक्रमच तसा भन्नाट आहे. त्याने टीव्हीचा रिमाेट कुरतडून टाकला आहे. हे ज्या काळात घडलेलं आहे, त्या काळात टीव्हीवर बरे कार्यक्रम असायचे, न्यूज चॅनेल नव्हते, तरीही या कुत्र्याचा इतका भडका उडाला हाेता. आताच्या काळातला शहाणा कुत्रा तर रिमाेट चावून फेकून देईलच आणि काहीतरी फेकून टीव्हीही फाेडून टाकेल.आजच्या काळातल्या कुत्र्याने असं करण्याचं काय कारण असेल? एकतर त्याच्या मालकवर्गाने फावल्या वेळात त्याला जवळ घेऊन त्याचे लाड केले पाहिजेत. त्याऐवजी जर ते सतत टीव्हीच बघत असतील तर त्याला राग येणार नाही का? बरं लाडक्या कुत्र्याला बाजूला ठेवून टीव्ही पाहात बसायचं असेल, तर काही बरं बघा. धर्मांमध्ये, जातींमध्ये भांडणं लावणाऱ्या बातम्या, लाेकांना चर्चेला बाेलावून त्यांना बाेलू न देता भाॅ भाॅ भुंकणारे अँकर, गेंगाण्या आवाजात रेटून खाेटं बाेलून थापा मारणारे, निर्लज्ज गरळ ओकणारे राजकीय पुढारी, सजावटी बायकांनी भरलेल्या दिखावटी मालिका, बाजारू, उथळ क्रिकेट स्पर्धा, हे सगळं मालकांमुळे कुत्र्यालाही सतत पाहावं लागत असेल तर त्याने ताे राग कुणावर काढावा?