साताऱ्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग माेकळा

    26-Apr-2026
Total Views |
 

IT 
 
पुणे-बंगळुरू महामार्गावर नागेवाडी (ता. सातारा) येथील 42 हेक्टर 55 आर एवढी शासकीय जमीन आयटी पार्क उभारणीसाठी महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) वर्ग करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग माेकळा झाला आहे.या निर्णयासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी माेठा पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्याेग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.सातारा जिल्ह्यातील आयटी क्षेत्राशी निगडित अभियंते आणि युवक व युवतींना साताऱ्यातच राेजगाराची संधी मिळाली पाहिजे.
 
येथील युवकांना पुणे, मुंबईसह अन्य राज्यांतील शहरांत नाेकरीसाठी जावे लागू नये यासाठी सातारा तालुक्यातील नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारावा यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच या जागेची पाहणी एमआयडीसीने केली हाेती. त्यानंतर गट नं. 308/1 येथील 42 हेक्टर 55 आर एवढे क्षेत्र आयटी पार्कसाठी आरक्षित करण्यात आले हाेते.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे शासकीय क्षेत्र आयटी पार्कसाठी एमआयडीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी मान्यता राज्याच्या महसूल विभागाने दिली.त्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग माेकळा झाला असून, पुढील कार्यवाही गतीने हाेण्यासाठी आवश्यक त्या सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.