वाहनचालकांना मराठी शिकवण्यास साहित्यिकांचा पुढाकार : सरनाईक

    26-Apr-2026
Total Views |
 
 

driver 
रिक्षा, टॅक्सी तसेच ई- बाइक टॅक्सी सेवांमधील व्यावसायिक वाहनचालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ आणि काेकण मराठी साहित्य परिषदेशी निगडित साहित्यिकांनी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक झाली. बैठकीस परिवहन आयु्नत राजेश नार्वेकर, मराठीभाषा विभागाचे उपसचिव नामदेव भाेसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डाॅ. शामकांत देवरे तसेच तज्ज्ञ व साहित्यिक उपस्थित हाेते.
 
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संपूर्ण राज्यभर रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी माेहीम राबवण्यात येणार आहे. या माेहिमेदरम्यान इतर नियमांसाेबतच चालकांना मराठीचे व्यवहारज्ञान आहे की नाही, याचीही पडताळणी केली जाईल. तसेच साहित्यिक व साहित्य संस्थांच्या मार्गदर्शनामुळे चालकांना मराठीचे व्यवहारज्ञान देण्याच्या माेहिमेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्य्नत केला.