‘दगडूशेठ’ची पंचधातूची मूर्ती 16 भैरव बटालियनला सुपूर्द

    26-Apr-2026
Total Views |
 

dagdusheth 
 
लष्करातील मराठा लाइट इन्फंट्रीतील जवानांची दगडूशेठ गणपतीशी निगडित असलेली श्रद्धा आणि परंपरा जपत नव्याने स्थापन झालेल्या; तसेच संवेदनशील भागात किंवा घटनांच्या वेळी कार्यरत राहण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेल्या 16 भैरव बटालियनला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पंचधातूची मूर्ती सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली.बटालियनच्या मागे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहावा, या भावनेतून ही मूर्ती देण्यात आली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली.मराठा लाइट इन्फंट्रीला गणपती मूर्ती देण्याची परंपरा पूर्वीपासूनच सुरू असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून 16 भैरव बटालियनने दगडूशेठ गणपतीचीमूर्ती देण्याची विनंती लेफ्टनंट कर्नल रणजितसिंह सिनसिनवार यांनी केली हाेती.
 
त्यानुसार विधिवत पूजा करून सुमारे दीड फूट उंचीची पंचधातूची मूर्ती बटालियनच्या प्रतिनिधींना नुकतीच प्रदान करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजू चिंचाेरकर आदी उपस्थित हाेते. ही बटालियन मंदिराची प्रारंभिक स्थापना बेळगाव येथे करणार आहे. त्यानंतर बटालियनच्या ऑपरेशनल तैनातीप्रमाणे या मंदिराचे स्थलांतर अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.आपल्या संस्कृतीत श्री काळभैरव आणि गणेश मंदिरात नग्न भैरव ही देवता रक्षणकर्ता म्हणून सज्ज असते.त्याचप्रमाणे ही बटालियन देशासाठी ऑपरेशन सिंदूरसह विविध महत्त्वाच्या घटनांत संरक्षण सज्जतेसाठी तयार करण्यात आली आहे. या बटालियनलाही दगडूशेठ बाप्पा आशीर्वादरूपी बळ देतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.