तीव्र उन्हामुळे शहरात पाणी वापर वाढल्याने धरणांतील पाणीसाठा कमी हाेत आहे. हा साठा जूनपर्यंत टिकवण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरात सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुण्यास 10 जूनपर्यंत बंदी घातली असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे; तसेच पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याची सूचनाही महापालिकेने केली आहे.ठाणे महापालिका क्षेत्राची लाेकसंख्या 27 लाख आहे. शहराला प्रत्यक्षात राेज 590 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा हाेताे.महापालिका क्षेत्रातील लाेकसंख्येच्या मानाने शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. शहराला आधीच 31 दशलक्ष लिटर कमी पाणी मिळत आहे.
त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण हाेत असतानाच त्यात जलवाहिनी दुरुस्ती तसेच इतर कामांमुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. दुसरीकडे तीव्र उन्हामुळे शहरात पाणी वापर वाढल्याने धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी हाेत आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहने धुणे आणि इतर साफसफाईच्या कामांवर 10 जूनपर्यंत निर्बंध घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा आणि नियमांचे काटेकाेर पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापाैर शर्मिला पिंपळाेलकर यांनी केले आहे.