नित्यनूतनपणाची ओढ हा मनुष्यस्वभाव आहे, याची जाण असल्यामुळेच श्रीसमर्थ म्हणतात की कार्यमग्न म ाणसाला जेव्हा त्याच त्याच जुन्या लाेकांचा कंटाळा येताे तेव्हा त्याने भ्रमण करून नवीन प्रांतात जाऊन तेथील लाेकांना एकत्र करण्यास प्रारंभ करावा. मात्र कधीही या दैवदत्त कार्यामध्ये आळस करू नये. माणसांचा अभ्यास थांबला की महंत संपला हे लक्षात ठेवून त्याने देहकष्टाला न कंटाळता सतत कार्यमग्न राहिले पाहिजे. इतरांप्रमाणेच आपलेही आयुष्य क्षणभंगुर आहे हे जाणून महंताने प्रत्येक क्षण सार्थकी लावलाच पाहिजे. महंताने व्याप वाढवावा पण उपाधीत म्हणजे त्या व्यापाच्या ममत्वात सापडू नये.
आपण उपाधीत सापडू या आशंकेने त्याने व्यापापासून लांबही राहू नये. सर्वांत आहे पण कशातही नाही अशी त्याची अलिप्त साक्षीत्वाची वृत्ती हवी.आळसाने कार्यनाश हाेताे व ढिम्म आळशी माणसाला ताे उघड्या डाेळ्यांनी पहावयाची दुर्दैवी वेळ येते.महंत हाेणे हा धकाधकीचा मामला असून ते दुर्बळ, अशक्त आणि येरागबाळ्याचे काम नव्हे.त्यासाठी खंबीर मन, तीक्ष्ण बुद्धी आणि दृढ निश्चय आवश्यक आहे. म्हणूनच महंताने दुसऱ्याला तयार करताना त्याच्याजवळ हे सामर्थ्य आहे ही खात्री करून घेऊनच त्याला कार्य व महंती शिकविण्यास सुरुवात करावी. आपण आपल्या सभाेवती आजही अनेक वृद्ध, क्षीण थकलेले लाेक पाहताे की जे क्षमता ओसरली तरी सत्तेला, पदाला किंवा संस्थांना चिकटून राहतात. अशाने त्या संस्थांचे नुकसान व कार्याचाही नाश हाेताे पण हव्यासामुळे अशा लाेकांना ते स्थान साेडवत नाही.