मेट्राे स्थानकांवर आता हाेणार व्यावसायिक चित्रीकरण

    25-Apr-2026
Total Views |
 

metro 
अंधेरी-पश्चिम मंडाले, मानखुर्द मेट्राे-2 मार्गिकेवरील डायमंड गार्डन मंडाले टप्पा नुकताच वाहतूक सेवेत दाखल झाला. केवळ पाच स्थानके असून, हा कमी अंतराचा टप्पा आहे. त्यामुळे या टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अत्यल्प प्रतिसाद असल्याने या मार्गिकेतून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) अपेक्षित महसूलही मिळत नाही.त्यामुळे आता एमएमआरडीएने तिकिटांव्यतिर्नित इतर पर्यायांद्वारे महसूल मिळवण्यासाठी ही मार्गिका व्यावसायिक चित्रीकरणासाठी देण्यास सुरुवात केली आहे. इतर मार्गिकांवरही चित्रीकरण करण्यात येत असून, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एमएमआरडीएलाव्यावसायिक चित्रीकरणातून 20 लाख 35 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.एमएमआरडीएच्या 14 मार्गिकांच्या प्रकल्पातील अंधेरी पश्चिम मंडाले मेट्राे-2 मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. त्यातील डायमंड गार्डन-मंडालेदरम्यानच्या 5.6 कि.मीचा टप्पा 8 एप्रिलला सेवेत दाखल झाला.
 
पाच स्थानकांचा समावेश असलेल्या या टप्प्याला अपेक्षित प्रवासी संख्या मिळत नाही. या मार्गिकेवरून आजघडीला दिवसाला 3 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यास अंधेरी पश्चिमपर्यंत सुरू झाल्यास या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, डायमंड गार्डन-मंडाले टप्प्याला प्रतिसाद नसल्याने महसूलही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता एमएमआरडीएने या मार्गिकेवर व्यावसायिक चित्रीकरणाला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे.मेट्राेत व स्थानकांवर चित्रीकरणास परवानगी दिली आहे.त्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.मेट्राे मार्गिकांवरील चित्रीकरणातून एमएमआरडीएला 2026-27 मध्ये 20 लाख 35 हजार रुपये महसूल मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 20.41 लाख रुपये, 2025-26 मध्ये 25.96 लाख रुपये आणि 2026-27 (चालू) वर्षात आतापर्यंत 20.35 लाख रुपये इतका महसूल मिळाला आहे.