मुंबईहून पुणे द्रुतगती मार्गावर केवळ 30 मिनिटांत पाेहाेचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अटल सेतू उन्नत मार्गाने मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाला जाेडण्याचे काम हाती घेतले आहे.सुमारे 7.35 कि.मीच्या या उन्नत मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला आहे.या कामातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत.आतापर्यंत 143 ठिकाणी पाया उभारणीचे, तर 141 ठिकाणी गर्डर उभारणी पूर्ण झाली आहे. प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करून हा उन्नत मार्ग सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियाेजन आहे. तसे झाल्यास मुंबईहून पुणे द्रुतगती महामार्गावर केवळ 30 मिनिटांत पाेहाेचणे शक्य हाेईल. यामुळे मुंबई, नवी मुंबईसह पुण्याला जाणेही साेपे हाेणार आहे.
मुंबई, नवी मुंबई प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएमआरडीएने अटल सेतू बांधला. हा सेतू सध्या कार्यान्वित आहे. अटलसेतूवरून पुढे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अतिजलद पाेहाेचता यावे यासाठी एमएमआरडीएने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर काेळखे काेनदरम्यान 7.35 कि.मीचा उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेतला. सहा मार्गिकांचा, 11.5 मीटर रुंदीचा आणि अंदाजे एक हजार काेटी खर्चाच्या या कामाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाचे काम सध्या सुरू असून, एमएमआरडीएने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत 143 ठिकाणी पाया उभारणीचे, 141 ठिकाणी खांबांचे तसेच गर्डर्सच्या उभारणीची कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.