अक्षय कुमार तयारच आहे

    25-Apr-2026
Total Views |
 

akshay 
 
अक्षय कुमार म्हटला की लाेकांना अलीकडे, अलीकडच्या व्याख्येत बसणारी देशभक्ती आठवते. अलीकडे काही महत्त्वाचे संदर्भ गाळून, इतिहासातल्या एका विचारधारेच्या गैरसाेयीच्या घटना वगळून बनावट इतिहास उभा करून, वर ही काल्पनिक कथा आहे हाे, असं सांगणारे सिनेमे काढण्याची पद्धत तयार झालेली आहे. काहीजण तर बनावट वर्तमानही विकत आहेत. अक्षय हा त्या परंपरेचा निष्ठावंत पाईक.त्यामुळे एकेकाळी त्याने प्रचारपटांची मालिकाच लावली हाेती. ते हळुहळू अपप्रचारपट आणि धादांत असत्यप्रचारपट कसे बनत गेले हे त्यालाही कळलं नसावं.
 
त्यामुळे अलीकडे कशाचीही राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली की त्या संदर्भातल्या माणसाचा चरित्रपट अक्षयला मध्यवर्ती व्यक्तिरेखेत घेऊन तयार हाेईल, अशी कल्पना केली जाते, एआयमुळे आता ती प्रत्यक्षातही आणणं साेपं आहे. अशाच एका सिनेमाची कल्पना इथे मांडली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचा माहाैल आहे. प्रचार शिगेला पाेहाेचला आहे, शिवराळ, असभ्य अपप्रचारही शिगेला पाेहाेचला आहे. या धामधुमीत साक्षात देशाच्या पंतप्रधानांनी एका दुकानात जाऊन झालमुरीचा आस्वाद घेतला म्हणजे केवढी चर्चा! झालमुरी म्हणजे बंगाली भेळ, तिला राईच्या कच्च्या तेलाचा झणका असताे.झालमुरी बनवणारा माणूसही प्रकाशात आला. आता त्याच्यावर सिनेमा निघाला, तर त्यात अक्षयशिवाय दुसरा काेण पात्र आहे मुख्य भूमिका साकारायला?