राजकारण करताना दुष्ट माणसांना घाबरून चालत नाही. तसे जर घाबरले तर कार्य थांबलेच म्हणून समजावे.यासाठी भांडकुदळ पुढारी असतील त्यांच्याशी झुंज घेऊन त्यांना नेस्तनाबूत करावे. परंतु त्यांचा माज उतरविला की त्यांनाही सावरून आपल्या कार्यात सहभागी करून घ्यावे. म्हणजे अशा दुर्जनांना लाेळवले नाही, तर महंताचा बाेज संपताे हे समजून अगत्य लाेळवावे पण नष्ट न करता आपल्यामध्ये सामील करून घ्यावे.असे सर्व करताना महंताने नेतृत्व स्वत:कडे घेऊन अनेक छाेट्या माणसांना ताकद देऊन माेठे करावे व त्यांच्याकडून ही कार्ये करवून घ्यावीत. अनेकदा शेवटच्या फळीतील कार्यकर्त्याला काय करायचे तेवढेच सांगून त्याच्याकडून करविले जाते. त्याचा अंतिम हेतू गुप्त ठेवला जाऊन अशा अनेक कामांमधून ताे साध्य केला जाताे हे महंतीचे सूत्र आहे.
माेठा समुदाय एकजिनसी ठेवायचा असेल, तर त्यासाठी त्यांना एकत्रित ठेवणारे नियमही असलेच पाहिजेत. अनिर्बंध मुक्त टाेळी आणि शिस्तबद्ध समुदाय यातील फरक ओळखून महंताने स्वत: अभिमान धरून मठ करून न बसता असे नियम घालून, स्वत: पाळून ते सर्वांना लावले पाहिजेत.ज्या दुर्जनांशी संबंध येईल त्यांना ओळखावे; पण जाहीरपणे ते प्रगट न करता एखाद्या सज्जनाप्रम ाणेच त्यांच्याशी वर वर तरी वागावे. कारण त्यांना उघडपणे निंदण्यामुळे त्यांचे कायमचे शत्रुत्व येऊन कटकट मागे लागते. हे अतिशय मुत्सद्दीपणाचे सूत्र सांगून श्रीसमर्थ म्हणतात, की त्यांना पाेकळ माेठेपणा देऊन आपल्याकडे वळवून सामील करून घ्यावे म्हणजे त्यांच्या कटकटीचा मार्ग कायमचा बंद हाेताे आणि अर्थातच महंताच्या कार्याचा मार्ग सुकर व निष्कंटक हाेताे.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299