सेल्फ-हीलिंग नावाचे हे तंत्रज्ञान भारतात दरवर्षी खड्ड्यांमुळे सरासरी 5,000 रस्ते अपघात हाेतात. ज्यात अंदाजे 2,000 लाेकांचा बळी जाताे. रस्त्यांवर भेगा आणि खड्डे पडण्यापासून राेखणाऱ्या तंत्रज्ञानावर केंद्र सरकार काम करत आहे.सेल्फ-हीलिंग नावाचे हे तंत्रज्ञान, भेगा पडण्यापूर्वीच त्या भरेल. ज्यामुळे खड्डे पडण्यास प्रतिबंध हाेईल.स्व-दुरुस्ती तंत्रज्ञान गरजेचे हे तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे सरकारची दरवर्षी सहा ते आठ हजार काेटी रुपयांची बचत हाेईल. सरकार हा पैसा खड्डे दुरुस्त करण्यासाठी खर्च करते. रस्ते वाहतूक मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, भारतासारख्या विशाल रस्ते जाळ्याच्या देशासाठी, स्व-दुरुस्ती तंत्रज्ञान ही केवळ एक चैनीची वस्तू नसून एक गरज आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, सरकार राष्ट्रीय महामार्गांच्या देखभालीसाठी दरवर्षी 15 ते 20 हजार काेटी रुपयांची तरतूद करते. या देखभाल निधीचा माेठा भाग केवळ पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे खराब झालेल्या भागांची दुरुस्ती आणि डागडुजीकरण्यासाठी खर्च केला जाताे.दरवर्षी, पावसाळा आणि प्रचंड वाहतुकीमुळे डांबरी रस्त्यांना तडे जातात आणि खड्डे पडतात. यावर उपाय म्हणून, सरकार स्व-दुरुस्ती तंत्रज्ञान अवलंबण्याची तयारी करत आहे. यामध्ये डांबरामध्ये स्टील वूलचे (अॅल्युमिनियम, ब्राँझ किंवा स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या तारांचे समूह) लहान तुकडे किंवा मायक्राे-कॅप्सूल मिसळले जातात. रस्त्यावरून जाताना इंडक्शन मशीन एक शक्तिशाली विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. रस्त्याच्या डांबरामध्ये छाेटे-छाेटे स्टील वूलचे किंवा स्टील फायबरचे बारीक कण अंतर्भूत केलेले असतात. ते चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात आल्यावर गरम हाेतात.
हे गरम झालेले तंतू त्यांच्या सभाेवतालचा डांबर किंचित वितळवतात. वितळलेला डांबर रस्त्यावरील भेगांमध्ये शिरते आणि त्यांना पूर्णपणे बंद करते. जसजसे यंत्र पुढे सरकते, तसतसे डांबर थंड हाेऊन पुन्हा घट्ट हाेते, आणि रस्ता अगदी नव्यासारखा हाेताे.
नवीन तंत्रज्ञान जसे की प्लॅस्टिक कचरा आणि फायबर मिश्रण दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर आणि निवडक राष्ट्रीय महामार्गांच्या लहान भागांवर आधीच तपासले गेले आहे. याव्यतिरिक्त, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या देखभाल नियमावलीमध्ये सेल्फ- हीलिंग म्हणजेच स्वतःहून दुरुस्त हाेणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची याेजना आहे.एनएचएआय आणि सीआरआरआय काही काळापासून इंडक्शन हीटिंग आणि स्टील फायबर तंत्रज्ञानावर संशाेधन करत आहेत.नेदरलँड्समधील डेल्फ्ट विद्यापीठाने या स्वतःहून दुरुस्त हाेणाऱ्या डांबराची यशस्वी चाचणी केली आहे.