केंद्राच्या महत्त्वाकांक्षी मिशन कर्मयाेगी उपक्रमांतर्गत महाराष्ट्राने प्रशासकीय प्रशिक्षणात ऐतिहासिक कामगिरी नाेंदवली आहे. साधना सप्ताह-2026 निमित्त आयाेजित विशेष साेहळ्यात महाराष्ट्राला टाॅप परफाॅर्मिंग स्टेट या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डाॅ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांना प्रदान करण्यात आला.या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे मंत्रालय, विभाग आणि राज्यांचा विज्ञान भवनात आयाेजित साेहळ्यात डाॅ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.याच साेहळ्यात महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबाेधिनी (यशदा) या संस्थेला स्पेशल अवाॅर्ड देऊन गाैरवण्यात आले.
ई-लर्निंग आणि प्रशासकीय प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या यशदाने आयजीओटी प्लॅटफाॅर्मचा प्रभावी वापर करून अधिकाऱ्यांना डिजिटल काैशल्यांत सक्षम केल्याबद्दल हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.क्षमता विकास आयाेग आणि कर्मयाेगी भारत यांच्या संयु्नत विद्यमाने 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान साधना सप्ताह साजरा करण्यात आला. तंत्रज्ञान, परंपरा आणि मूर्त परिणाम ही यामागची संकल्पना हाेती. 47 लाख शासकीय कर्मचारी यात सहभागी झालें हाेते. 33 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील 5 लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी आयजीओटी या डिजिटल प्लॅटफाॅर्मवर प्रत्येकी किमान 4 तासांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.राज्याच्या या समर्पित प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची विशेष श्रेणीत निवड करण्यात आली. महाराष्ट्राच्या प्रशासकीय शिस्तीचे आणि कर्मचाऱ्यांच्या काैशल्यावर आधारित प्रतिसादाचे विशेष काैतुक डाॅ. जितेंद्र सिंह यांनी केले.