छत्रपती संभाजीनगर शहरात 15 मजल्यापर्यंतच्या इमारती उभारण्यास सुरुवात झाली आहे. उंच इमारतींना आग लागल्यास महापालिकेकडे तेवढी सक्षम, अत्याधुनिक यंत्रणा नव्हती. ही कमतरता दूर करण्यासाठी 15 काेटी 78 लाख रुपये खर्चाचे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक वाहन खरेदी करण्यात आले असून, या वाहनाचे लाेकार्पण महापालिका मुख्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा नियाेजन समितीमार्फत वाहने खरेदीसाठी गतवर्षी निधी उपलब्ध करून देण्यात आला हाेता. 36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वाॅटर टाॅवर सेट मशिनरीची खरेदी करण्यात आली.या वाहनात 14 हजार लिटर पाण्याची क्षमता असलेला वाॅटर बाउजर आणि अग्निशमनासाठी उपयाेगी राेबाेचा समावेश आहे.
ही यंत्रणा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा 10 ते 12 मजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यास सक्षम आहे. वाॅटर टाॅवरच्या बूमवर बसवलेला माॅनिटरिंग कॅमेरा जिथे आग लागली तेथे पाठवता येते. आग किती माेठी आहे, हे त्यामुळे लक्षात येते.थर्मल कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाहनाच्या कंट्राेल पॅनेलमधून ऑपरेटरला तळमजल्यापासूनच आगीवर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आगीजवळ जाण्याचा धाेका टाळता येणार आहे.या यंत्रणेत असलेल्या राेबाेच्या साहाय्याने आग आटाेक्यात आणण्याचे काम अधिक सुरक्षित आणि जलदगतीने पार पाडता येणार आहे.