महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून काेकण विभागात दमदार कामगिरी साध्य

    19-Apr-2026
Total Views |
 
 

tourism 
 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) काेकण विभागाने पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत उत्पन्नात विक्रमी वाढ नाेंदवली. गणपतीपुळ्यातील पर्यटक निवासाने 10 काेटींपेक्षा अधिक उलाढाल नाेंदवली असून, तारकर्लीतून 3.20 काेटींचे उत्पन्न मिळाले आहे.मर्यादित खाेल्यांच्या उपलब्धतेतही मिळालेले हे उत्पन्न विभागाचे व्यवस्थापन उत्कृष्ट असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन विभागाच्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डाॅ. बी. एन. पाटील, व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, उपसचिव-पर्यटन संताेष राेकडे, उपसचिव विजय पाेवार, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल; तसेच सहसंचालक संताेष जाधव उपस्थित हाेते.
 
गणपतीपुळे आणि तारकर्लीतील पर्यटक निवासांनी उत्पन्नात माेठी भरारी घेतली आहे. पर्यटक निवासांमध्ये खासगी हाॅटेल्सप्रमाणेच उच्च दर्जाच्या सुविधा माफक दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे पर्यटकांचा विश्वास वाढत असून, पर्यटनाला चालना मिळत आहे. काेकण विभागाने मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक उत्पन्न मिळवून सर्वाेत्तम कामगिरी केली आहे. या यशाबद्दल देसाई यांनी संपूर्ण काेकण विभागाच्या चमूचे काैतुक केले. पुढील काळातही पर्यटन क्षेत्र अधिक गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.