कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गाेदावरीसह तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आणि गाेदावरी पात्रात पानवेलींचे साम्राज्य पसरलेले असताना या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने आता 80 कंत्राटी कामगारांची फाैज उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. गाेदावरीसह वालदेवी, नंदिनी, वाघाडी, कपिला यासह इतर उपनद्यांच्या दाेन्ही बाजूला 100 फूट अंतरापर्यंत राेज स्वच्छता माेहीम राबवण्यात येणार आहे.गाेदावरी संवर्धन कक्षाने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर निर्णय हाेणार आहे. गाेदावरीला प्रदूषणाच्या जाेखडातून बाहेर काढण्यासाठी नाशिक महापालिकेने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीड हजार काेटींची सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणी आणि अस्तित्वातील केंद्राच्या सक्षमीकरणाची कामे हाती घेतली आहेत. काही ठिकाणी सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळते. या वाहिन्यांचे स्थलांतर करण्याचे नियाेजन केल्याचे सांगितले जाते.
नदीलगतच्या पात्रात कळत नकळत निर्माल्य, प्रसाद सामग्री टाकली जाते. धार्मिक विधींसाठी देशभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांसमाेर नाशिक महापालिकेची प्रतिमा मलीन हाेत आहे.गाेदावरीच्या उपनद्यांच्या काठालगत नागरी वस्ती व झाेपडपट्ट्या आहेत. काही ठिकाणी कचरा, घाण, निर्माल्य पात्रात टाकले जाते. त्यामुळे प्रवाहातही अडचणी येतात परिसरात डास, दुर्गंधी व राेगराई पसरते. ही एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने नदी स्वच्छतेसाठी 80 कामगार नेमण्याचे नियाेजन केले आहे.पावसाळ्याचा कालावधी वगळून यासाठी अडीच काेटींचा खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात निविदा काढून या कामासाठी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज हाेत असताना गाेदावरीसह तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगार नेमले जातील. याआधी नदीपात्रात कचरा टाकू नये म्हणून रामकुंड परिसरात कंत्राटी कामगारांची नियु्नती झाली हाेती.