ज्येष्ठ नागरिकांनाे खर्च करा, लाईफ एन्जाॅय करा

    14-Apr-2026
Total Views |
 


life
 
 
 
पैसे मिळवण्यात आणि उडवण्यातही तरबेज असणाऱ्या सध्याच्या पिढीचा यावर विश्वास बसणार नाही. पण, भारताच्या लाेकसंख्येच्या माेठ्या भागाचे आजही हे वास्तव आहे. आपण इथे 1950च्या आणि 60च्या दशकात जन्मलेल्या लाेकांबाबत बाेलताे आहाेत. त्यांची मुले माेठी हाेऊन आता कमवायला लागली आहेत. त्यामुळे मुलांसाठी खर्च करण्याची त्यांना आता गरज लागत नाही. मुले कमावती असल्याने आणि स्वतःची बचत किंवा पेन्शन असल्याने स्वतःच्या भवितव्याची चिंता नसते.पण तरीही स्वतःच्या हृदयाला चिंतामुक्त कसे ठेवायचे आणि आपल्याकडचे पैसे कसे खर्च करायचे, हे या पिढीला समजत नाही.याबाबत या जुन्या पिढीचे विचार जाणून घेतले तर ते म्हणतात की, नवीन पिढी बिनधास्त खर्च करते कारण ते निर्भय आहेत आणि स्वतःच्या भविष्याबाबत आशावादी असतात. स्वतःच्या क्षमतांवर त्यांचा विश्वास असताे.आम्ही तसे करू शकत नाही कारण अडचणीचे दिवस येतील म्हणून आम्ही घाबरत असताे.
 
 
खरे तर त्यांना मनातून हे माहीत असते की, आता भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. पण तरी काटकसर करण्याची आयुष्यभर लागलेली सवय काही जाता जात नाही. आयुष्यभर त्यांनी अभावाची परिस्थिती अनुभवली. 600 चाै. फुटांचे घर ते बांधू पाहत हाेते, तेव्हा सिमेंट मर्यादित प्रमाणात मिळायचे. पाऊस पडून ते भिजेल आणि मग टणक हाेईल या भीतीने सिमेंट प्लॅस्टिकच्या माेठ्या कागदाने झाकून ठेवले जायचे. रेशनवर स्वस्तात मिळणाऱ्या राॅकेल आणि साखरेसाठी ते लांब रांगांत उभे राहायचे. ऊन पावसाची पर्वा ना करता कितीही लांब अंतरावरच्या शाळेत चालत जायचे. काटकसर हा त्यांच्या राेजच्या आयुष्याचा मूलमंत्र हाेता. ते काॅलेजमध्ये असताना नेमक्या त्याच काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर बेराेजगारीचे ढग घाेंघावू लागले हाेते. गणित, भाैतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र साेडून मिळवलेल्या पदवीवर नाेकरी मिळवायला मात्र त्यांना खूप झगडावे लागले.
 
1990च्या दशकात आलेल्या उदारीकरणाच्या लाटेने मात्र त्यांच्यापैकी अनेकांसाठी खासगी क्षेत्रात नाेकऱ्यांची दारे खुली केली. या नाेकऱ्यांत त्यांना चांगला पैसा मिळाला. ताे आणखी वाढवण्यासाठी त्यांनी ताे शेअर बाजारात गुंतवला. शिवाय ते नाेकरी करीत असलेल्या कंपन्यासुद्धा स्वतःचे शेअर त्यांच्या कामाच्या माेबदल्याचा भाग म्हणून त्यांना देत हाेत्याच. या सगळ्यातून, त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी अपेक्षा केली हाेती त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात संपत्ती त्यांनी जमवली. कनिष्ठ मध्यमवर्गातून आपण उच्च मध्यमवर्गात कधी प्रवेश केला आणि त्यात स्थिरावलाे, हे त्यांना लक्षात सुद्धा आले नाही. हे सगळे करत असताना त्यांच्या आधीच्या, अगदीच ताेकडी पेन्शन असलेल्या पिढीचीही जबाबदारी त्यांना घ्यावी लागली हाेती.
 
त्यांच्या मुलांनी त्यांच्यापेक्षा एक पायरी आणखी वर जावे यासाठी आणि जगभरात निर्माण हाेणाऱ्या संधी मिळवण्यासाठी त्यांची मुले पात्र बनावीत यासाठी त्यांना चांगले शिक्षण देण्याचा या पिढीने प्रयत्न केला आहे. त्यासाठी लागेल तेवढा पैसा खर्च केला आहे. पण आमच्या स्वतःवर खर्च करताना मात्र आम्ही कचरताे. यासाठी काय करावे, असा उलट प्रश्न ते विचारतात. खरेतर यावर उपाय आहे.साठवलेले पैसे पुरेसे आहेत हे लक्षात घ्या सर्वप्रथम, नव्याने पैसे साठवणे, काेणत्याही मार्गाने बचत करणे थांबवा. असा एक साधा नियमच बनवा की आतापर्यंत जे साठवलेले पैसे आहेत ते पुरेसे आहेत. आता आणखी साठवण्याची आणि आधीच्या बचतीत भर घालण्याची गरज नाही.तुमचे पेन्शनचे आणि व्याजाचे असे सगळे मिळून जेवढे पैसे तुमच्या हातात दरमहा येत आहेत ते वापरण्याचे मार्ग शाेधा. झाडे खरेदी करा. मित्रांना वरचेवर बाेलवा आणि त्यांना चांगले पदार्थ करून खाऊ घाला.
 
तुमच्या महिना उत्पन्नाची रक्कम खर्च कशी करायची याचे नीट नियाेजन करा. आणि ती तशी खर्च हाेईल याची काळजी घ्या. एखादी गाेष्ट बाजूला ठेवण्याची सवय साेडून देणे तसे अवघड असते. पण या आनंदमय प्रवासाची ती याेग्य सुरुवात ठरेल.दुसरे, यानंतर तुमच्या आवडी आणि तुमच्या आनंदाच्या मार्गांची यादी करा. आतापर्यंत लागलेली काटकसरीची सवय तुम्हाला स्वतःवर, स्वतःसाठी, स्वतःच्या गरजांसाठीही पुरेसा खर्च करू देत नव्हती. तर आनंदाच्या बाबींसाठी कधी खर्च करणार? पण आता मात्र आपले आयुष्य आणखी सुखकर आणि आरामदायी हाेण्यासाठी काेठे खर्च करावा लागेल, हे शाेधणे महत्त्वाचे आहे. अगदी तुम्ही राेज वापरता त्या गाद्या आणि उशा सुद्धा आरामदायी नसतील तर बदलून चांगल्या आरामदायी घ्या.आरामदायी चप्पल अथवा बूट खरेदी करा. राेज तुम्ही वापरता त्या वस्तूंमध्ये आणखी आरामदायीपणा येण्यासाठी त्या बदलता येतील का, याचा विचार करा.
 
तिसरे, माैजमजा, विसावा, आनंद आणि सुखासाठी थाेडी जागा ठेवा. आणखी चांगली आणि दीर्घकाळ झाेप घेता यावी यासाठी चांगले अन्न घ्या. बाहेरून मागवा.आठवड्यातून किमान एकदा थिएटरमध्ये जाऊन चांगले चित्रपट बघा. त्यानंतर एखाद्या चांगल्या रेस्टाॅरंटमध्ये जाऊन तेथे खाऊन मगच घरी जा. तुमच्याकडच्या पैशांना इतरांसाठी आधी वापरण्याचे दिवस आता संपले आहेत हे लक्षात घ्या. आणि स्वतःला त्या यादीमध्ये अग्रस्थानी ठेवा.चाैथा मुद्दा. आयुष्यभर लक्षात राहतील असे चांगले अनुभव घेण्याची मानसिक तयारी ठेवा.उंचच उंच पर्वतरांग किंवा समुद्राचा किनारा दिसेल अशी रूम बुक करा.एखाद्या निसर्गसंपन्न खेड्यातल्या रिसाॅर्टमध्ये काही दिवसांसाठी राहायला जा. प्रवास करताना तुम्ही तुमची आणखी एक इच्छा पूर्ण करताहात, चार दिवसांत भारत झाला, एक दिवसात फ्रान्स उरकला, आता दाेन दिवसांत बाकी तीन देशांत जाऊन यायचे आहे, अशा पद्धतीने करू नका.
 
जेथे जाणार आहात, त्या ठिकाणाची आधी पुस्तकांतून, नेटवरून पूर्ण माहिती करून घ्या. आणि मग तेथे गेल्यावर चांगला गाईड शाेधून त्याच्याबराेबर माहिती घेत ते ठिकाण पाहा. इथून आल्यावर त्या ठिकाणाबाबतचा तुमचा अनुभव लिहून काढा. ताे लिहायला जमला, तर तुम्ही ते ठिकाण नीट बघितले.नाही तर उरकले, असे हाेईल. जाल तेथे तेथील स्थानिक अन्न खा. तेथे भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय अन्न, वरण भात, त्यावर लिंबू पिळून, त्यावर तुपाची धार मिळाली यावर खुश हाेऊ नका. आपले नेहमीचे अन्न मिळाले तरी घेऊ नका.तेथील स्थानिक अन्न तुम्ही कधी खाणार? आणि साेशल मीडियावर पाेस्ट करण्यासाठी फाेटाे काढू नका.तुमच्या जीवनातले स्मरणात राहतील असे क्षण टिपून घेण्यासाठी फाेटाे काढा. पण फाेटाे काढण्यापेक्षाही ते क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यास जास्त प्राधान्य द्या.
 
पाचवा मुद्दा म्हणजे, तुम्ही तुमचे विल करून ठेवले असेल. त्यामध्ये गरजू लाेकांसाठी तुमच्या संपत्तीचा काही हिस्सा बाजूला काढून ठेवला असेल. हे चांगलंच आहे. पण ते हाेणार तुमच्यानंतर. म्हणून तुम्ही गरजू मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या. पैशांसाठी एखाद्या हाेतकरू गरजू मुलीचे शिक्षण अडकलेले असेल तर पुढे हाेऊन त्या मुलीला मदतीचा हात द्या. लक्षात ठेवा, मुलगी शिकली तर तिच्या माहेरचाही उद्धार हाेताे, आणि तिचा विवाह झाल्यावर तिच्या सासरचाही.म्हणजे एक मुलगी शिकली तर ती किमान दाेन कुटुंबांना वर आणते.संपत्तीने आधीच ओसंडून वाहणाऱ्या धार्मिक स्थळांनाच आणखी देणगी देण्यापेक्षा एखाद्या मुलीचे शिक्षण केलेत तर तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान मिळेल. आणि ती मुलगीसुद्धा तुमच्यावर तुमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम करेल.एखाद्याचे जीवन बदलण्यासाठी तुमच्या पैशांचा उपयाेग हाेऊ देत.