गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी अपर मुख्य सचिवांच्या (गृहनिर्माण) अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. शेलू व वांगणीत पात्र कामगारांना घरे देण्याबाबत; तसेच ठाणे, उलवे, बाेरिवली, मिरा-भाईंदरमध्ये घरांची उपलब्धता वाढवून पनवेल-काेनगावमधील 2521 घरांची लाॅटरी काढावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाला दिले आहेत. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. गृहनिर्माण विभागाने या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार या इतिवृत्तानंतर मुंबईत जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत, असे मत गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार यांनी व्य्नत केले आहे. शेलूतील प्रकल्प कर्मयाेगी एव्हीपी रियालिटीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. तेथे गिरणी कामगारांनी स्वेच्छेने संमती पत्र भरून दिली आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 मे राेजी हाेणार आहे. संमतीपत्र दिलेल्या कामगारांना घरे मिळण्याचा मार्ग यामुळे माेकळा झाला आहे.