जितुके कांही उत्तम गुण । ते समर्थांचे लक्षण।2।

    01-Apr-2026
Total Views |
 

saint 
 
ज्याला काेणाचीही काळजी व कमतरता साेसत नाही व जाे त्याच्या मदतीला धावून जाताे आणि पैशाचा कधीच माेह धरत नाही, ताे उत्तम पुरुष हाेय. काेणी त्याची निंदानालस्ती केली, तरी त्याची देहबुद्धी नष्ट झालेली असल्याने त्या टीकेने ताे अजिबात विचलित हाेत नाही.शरीर व दृश्य विश्व हे मिथ्या आहे ही त्याची दृढ भावना असल्याने शरीराची केलेली निंदाही मिथ्या आहे, अशी त्यांची धारणा असते. देहबुद्धी जिंकलेला असा ज्ञाता देहविकार हे अवलक्षण आहे हे समजून स्वत: मात्र देहात असूनही विलक्षण स्वगुणांनी लाेकांना स्तिमित करताे. खरं तर उत्तम गुणांमुळे आनंदून अनेक माणसे जवळ येतात, तर वाईट गुणामुळे सर्वांनाच तिटकारा निर्माण हाेताे हे सत्य आहे. पण ते प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्या बुद्धिमान गुणी पुरुषाच्यगाैरवाची सामान्य माणसांना कल्पनाही येऊ शकत नाही.
 
‘गुणं गुणीनां वेत्ती’ या वचनाप्रमाणे गुणवंताचे अगाध गुण जाणण्यास थाेडे तरी गुण अंगी असावे लागतात.असे गुणवान पुरुष लाेकांचे अपराध व चुका क्षमा करून पाेटात घालतात व त्यामुळे अशी प्रचिती आल्यावर सज्जन दुर्जन असे सर्वच लाेक त्यांचा आदर करून भजू लागतात. जगामध्ये स्वत:च स्वत:ला थाेर म्हणवून घेणारे अनेक पढतमूर्ख असतात. परंतु ज्याला समाज श्रेष्ठ म्हणेल ताेच धीर, गंभीर, उदार व पराेपकारी पुरुष महापुरुष म्हणून विख्यात हाेताे ही वस्तुस्थिती आहे.अवगुण हे करंट्याचे लक्षण असून ते साेडावेत आणि उत्तम गुणांची कास धरावी. असे आवाहन करून हा समास पूर्ण करताना श्रीसमर्थ म्हणतात की, असा उत्तम गुणवान पुरुषच समर्थ म्हणून सर्वत्र पूज्य ठरताे, हे ओळखून साधकांनी गुणाेपासना करावी.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299