ठाणे जिल्ह्यातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्याेगांना (एमएसएमई) वेग देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवर्तन संस्था (मित्रा) आणि वाधवाणी फाउंडेशनच्या पुढाकारातून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील निवडक उद्याेगांची क्षमता वाढवून त्यांची वार्षिक उलाढाल पाचपटीने वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी ठाणे जिल्हा उद्याेग केंद्राने पुढाकार घेतला असून, उद्याेग क्षेत्रासाठी हा बूस्टर डाेस ठरणार आहे. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारीप्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या उपक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यात माेठे औद्याेगिक क्षेत्र आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, कल्याण-डाेंबिवली औद्याेगिक क्षेत्र, अंबरनाथची आनंदनगर एमआयडीसी तसेच उल्हासनगरमधील अनेक लघुउद्याेग असे माेठ औद्याेगिक क्षेत्र आहे. त्यात लघू आणि मध्यम उद्याेगांचा माेठा समावेश आहे.
हे उद्याेग क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी काैशल्य विकास, उद्याेजकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित या याेजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.उद्याेगांच्या कार्यपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादन क्षमता, कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.उद्याेगांना तांत्रिक मार्गदर्शन, व्यवस्थापन काैशल्य प्रशिक्षण, डिजिटल परिवर्तन, बाजारपेठेचा विस्तार; तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या विविध बाबींमध्ये साह्य केले जाणार आहे.त्यामुळे उद्याेगांना केवळ आर्थिक वाढच नव्हे, तर दीर्घकालीन शाश्वत विकास साधता येणार आहे. या याेजनेचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणजे सध्या 5 ते 100 काेटींची वार्षिक उलाढाल असलेल्या सूक्ष्म व लघुउद्याेगांची क्षमता वाढवणे.वाधवाणी फाउंडेशनच्या तांत्रिक व धाेरणात्मक सहकार्याच्या माध्यमातून या उद्याेगांची उलाढाल टप्प्याटप्प्याने वाढवून ती 500 काेटींपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील उत्पादन; तसेच सेवा क्षेत्रातील सुमारे 1500 इच्छुक उद्याेगांची या उपक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.