उत्तमगुणे श्रृंघारला । ताे बहुतांमधे शाेभला । पुण्यरासी माहांपुरुष।1।

    28-Mar-2026
Total Views |
 
 

saint 
जाे उत्तम गुणांनी मंडित असेल ताेच खरा भाग्यवान हाेय. देवाच्या कृपेनेच हे उत्तम गुण घेण्याची बुद्धी निर्माण हाेते.म्हणून अशा भाग्यवान माणसाला त्या कृपेच्या द्वारे देवाचा सदैवचा सहवास मिळताे. त्यामुळे त्याला ‘सदेव’ अशा नावाने संबाेधून चाैथ्या ‘सदेवलक्षण’ या समासात श्रीसमर्थ अशा सदेवांचे वर्णन करतात.मागील समासांत जी लक्षणे साेडावयाची आहेत, अशा अवलक्षणांचे वर्णन केल्यावर स्वत:ला व सम ाजालासुद्धा परम सुख देणाऱ्या सदेव लक्षणांच्या माहितीचे श्राेत्यांनी ती घेण्यासाठी श्रवण करावे, असे सांगून श्रीसमर्थ या समासाला सुरुवात करतात. ज्याच्या अंगी कांही गुण उपजतच असतात, तर काही उत्तम गुण ताे प्रयत्नपूर्वक घेताे; नेहमी पराेपकार करीत गेल्याने सर्वांच्या हृदयात प्रेमादराचे स्थान मिळविताे ताे सदेव भाग्यवान हाेय.
 
लेखनवाचनाचा अभ्यास असल्याने ताे सुंदर लिहिताे आणि वेगाने; पण शुद्ध अर्थाेच्चाराने वाचून श्राेत्यांना त्यातील अर्थ स्पष्ट करून समजावून देऊ शकताे. उत्तम लक्षणांची जाण असल्याने ताे नेहमी उत्तम संगतीत वावरताे; पण इतरेजनांचेही मन न माेडता सर्वांशी स्नेहबंध ठेवून असताे.असा उत्तम गुणी मनुष्य भाग्याला सुपात्रच असताे व आपल्या वागण्याने जगमित्र हाेताे. आपण आजही अनेक लाेक अमक्याचा वंशज, तमक्या श्रेष्ठाचा पुतण्या, प्रसिद्ध गायिकेचे बंधू, प्रख्यात पुढाऱ्याचा भाचा, मंत्र्याचा पुत्र असे दुसऱ्याच्या आधाराने प्रसिद्धी मिळवून कीर्तीमार्गाची वाटचाल करताना पाहताे. पण श्रीसमर्थ म्हणतात खरा भाग्यवान पुरुष स्वपराक्रमाने व स्वगुणानेच कीर्तीमान हाेताे. त्याला काेणाच्या आधाराची किंवा टेकूची गरज लागत नाही. त्याचे वागणे नियमबद्ध, पाठांतर प्रचंड आणि ज्ञान अगाध असते व ताे सर्वांचे मनाेगत ओळखून त्यांना सुखी करण्याच्या वृत्तीने आचरण ठेवताे. त्याची लाेकप्रियता वर्णताना श्रीसमर्थ म्हणतात - ताे सकळ जनासी व्हावी । जेथे तेथे नित्य नवा । मूर्खपणें अनुमान गाेंवा । कांहीच नाहीं ।।5।।