राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत काेणतीही टंचाई नसून पेट्राेल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्राेलियम (एचपीसीएल), भारत पेट्राेलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली.तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्चला राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, पेट्राेलचा साठा 2 लाख 5 हजार 232 किलाे लिटर, डिझेलचा साठा 4लाख 67 हजार 603 किलाे लिटर, तर एलपीजीचा साठा 30767 टन इतका उपलब्ध आहे.हा साठा राज्याच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे.
तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ करण्यात आली असून, सर्व उत्पादक कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना नियमितपणे पेट्राेलियम पदार्थांचा पुरवठा हाेत असून,पुरवठा साखळीत काेणताही अडथळा निर्माण झालेला नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.नागरिकांनी काेणत्याही प्रकारच्या अफवा, साेशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. भीतीपाेटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी माेठ्या प्रमाणात पेट्राेल किंवा डिझेल खरेदी करू नये.पेट्राेल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी.इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून सर्व आवश्यक उपाययाेजना करण्यात येत असून, यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा. काेणतीही शंका किंवा माहिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय माध्यमांवरच अवलंबून राहण्याचे आवाहन विभागाने केले आहे.