मनुष्य हा सामाजिक प्राणी असून, कुटुंब- समूह-समाजासाेबत राहणे पसंत करताे. माणूस पूर्वीच्या काळी जंगलात जगताना, संरक्षणासाठी, अन्न-वस्त्र-निवारा, पाणी मिळविण्यासाठी, ऊब आणि साथ मिळवण्यासाठी समूहाची गरज भासत असे. मनुष्य हा विचारशील, बुद्धिमान प्राणी आहे. त्याने याच तत्त्वावर कुटुंब, समुदाय, समाज, राष्ट्रांची निर्मिती केली. माणूस इतर माणसांबराेबरील संबंधांतून अधिक चांगले, अर्थपूर्ण जीवन जगू शकताे. संवाद, संवेदना, सहकार्य, सहवास, समरसता ही माणसाच्या आत्म्याच्या आणि मनाच्या गाभ्यात वसलेली मूलतत्त्वे आहेत. यांच्याच आधारावर समाजाची निर्मिती झाली आणि समाजरचना टिकून आहे.आत्मीयतापूर्ण नातेसंबंध पूर्वी संबंध सहज आणि सत्याशी जाेडलेले असत. लाेकांना एकमेकांविषयी संवेदना हाेती; नात्याच्या देखाव्यात रस नव्हता.
परस्परांबद्दल असलेल्या आत्मीयतेवर संबंध जिवंत राहत असत.एकमेकांच्या सुख-दुःखात माणसे पाठीशी उभी राहत. आता ही आत्मीयता, संवेदना आणि संवाद कुठेतरी हरवले आहेत. त्यांच्या जागी लाईक, काॅमेंट आणि शेअर, सबस्क्राइबने घेतली आहे.साेशल मीडियामुळे संबंधांपेक्षा संपर्काला महत्त्व परंतु आता समाजजीवन, सामाजिकता आणि समाजव्यवस्था हळूहळू बदलत आहे. लाेक आता संबंधांच्या गाभ्यापेक्षा संबंधांची संख्या वाढवण्यावर भर देत आहेत. त्यांना संबंधांपेक्षा केवळ संपर्कांची गरज भासते, जे फक्त भाैतिक गरजा पूर्ण करू शकतील. सामाजिक माध्यमांच्या युगानंतर भावना अधिक उथळ हाेत आहेत.लाेक प्रत्यक्ष संवाद कमी साधतात आणि इमाेजींद्वारे भावना व्यक्त करणे अधिक पसंत करतात. आता संवाद कमी आणि टिपण्ण्या अधिक झाल्या आहेत.
साेशल मीडियावरील भ्रामक गर्दीतील एकटेपणा अनेक लाेकांचे समाज माध्यमांवर हजाराे मित्र, अनुयायी, चाहते असतात. साेशल मीडियावर जितका अधिक संपर्क, जितके अधिक लाेक आपल्याबराेबर असल्याचा भ्रम लाेकांना हाेऊ लागताे. प्रसिद्धी वाढते, तसा अहंकार वाढताे आणि अधिक प्रसिद्धीच्या हव्यासात ताे अधिकच अडकत जाताे. पण प्रत्यक्ष आयुष्यात गरज पडल्यास खांद्याला खांदा लावून उभे राहतील असे पाच जणही नसतात. साेशल मीडियावर दरराेज लाखाे लाेक एकमेकांना भेटतात, बाेलतात, हसतात, आनंद व्यक्त करतात; पण अंतर्मनातून काेणतीही खरी जवळीक निर्माण हाेत नाही.तथाकथित चाहत्यांच्या, मित्रांच्या गर्दीतही एकटेपणाचा हा दंश अत्यंत भयानक असताे.
साेशल मीडियावर गर्दी जमवणे साेपे सामाजिक प्रश्न असाे वा इतर काेणताही विषय - साेशल मीडियावर गर्दी जमवणे अत्यंत साेपे झाले आहे. एखादा नवा कल निर्माण करून, क्षणिक आनंदाचे आमिष दाखवून लाेकांना आकर्षित केले जाते. पण, ही निरर्थक व तथाकथित गर्दी जमावणारे लाेक स्वतःच्या कुटुंबीयांना, जवळच्या व्यक्तींना अशा खाेट्या गर्दीपासून दूर ठेवतात. कारण त्यांना ठाऊक असते की, गर्दी क्षणभंगुर आहे. खऱ्या अर्थाने गरज भासली, संकट उभे राहिल्यास गर्दी साथ देणार नाही. फारतर दाेन-चार जणच प्रत्यक्ष पाठीशी उभे राहतील.स्वार्थामुळे एकत्र आलेली गर्दी समाज माध्यमांवरील बहुतेक संबंध स्वार्थाच्या पायावर उभे राहतात, टिकतात, तुटतात.पण, जाेपर्यंत खरा अनुभव येत नाही, ताेपर्यंत माणसाला समजत नाही. ताे ज्यांना आपला समजून अभिमानाने फिरत असताे, ते प्रत्यक्षात त्याचे नसतातच. ती केवळ एखाद्या मुद्यावर एकत्र आलेली गर्दी असते - नाशवंत आकर्षणाने बांधलेली, क्षणात विरघळून जाणारी!