मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातील रस्त्यांवर आता डबल डेकर बस धावणार असून, येत्या सहा महिन्यांत या बस टीएमटीच्या ताफ्यात दाखल हाेणार आहेत. याबाबतची घाेषणा ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) अर्थसंकल्पात करण्यात आली. यामुळे ठाणेकरांना आता डबल डेकर बस सुविधा उपलब्ध हाेणार आहे.टीएमटीचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 791 काेटी 86 लाखांचा अर्थसंकल्प व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर केला. पुण्याल सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ राेड ट्रान्सपाेर्ट (सीआयआरटी) संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, 1 लाख लाेकसंख्येस 50 बस असणे आवश्यक आहे. ठाणे शहराची लाेकसंख्या 27 लाख असून, शहरास 1350 बसची आवश्यकता आहे.
शहरात सरासरी तीन लाख प्रवासी राेज प्रवास करतात; परंतु शहरात 467 बस उपलब्ध आहेत. सीआयआरटीच्या तत्त्वानुसार ही संख्या अपुरी असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे परिवहन उपक्रमातील बसची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. पीएम ई-बस याेजनेतून 100 वातानुकूलित विद्युत बस, 15व्या वित्त आयाेगातून 160 वातानुकूलित विद्युत बस, शंभर सीएनजी, अशा एकूण 370 बसची खरेदी करण्यात येणार आहे.यात 10 डबल डेकर बसचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत 10 डबल डेकर बस खरेदी करण्याचा प्रस्तावास मान्यता देण्यात आली. या बस खरेदीची निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली.