संरक्षण संशाेधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) अहिल्यानगर जिल्ह्यात 1 हजार एकर जागेची मागणी केली आहे. या जागेत डीआरडीओचा क्षेपणास्त्र प्रक्षेपकाचा प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. हा प्रकल्प मार्गी लागल्यास संरक्षण साहित्य निर्मितीचा हब अशी जिल्ह्याची ओळख हाेणार आहे, असे त्यांनी सांगितले.विखे पाटील यांच्या सूचनेनुसार व डीआरडीओने केलेल्या मागणीनुसार राहुरीजवळील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 1 हजार एकर जागेची पाहणी करून त्या संदर्भातील कागदपत्रांची मागणी करणारे पत्र कृषी विद्यापीठाला देण्यात आल्याचे महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी गणेश राठाेड यांनी सांगितले.
औद्याेगिक वापराच्या गॅस टंचाईसंदर्भात विखे पाटील यांच्या उपस्थितीत असाेसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) या उद्याेजकांच्या संघटनेने बैठक आयाेजिली हाेती. त्यात बाेलताना विखे पाटील यांनी डीआरडीओच्या प्रकल्पासाठी राहुरी विद्यापीठाची 1 हजार एकर जागा मागितली असून, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाल्याची माहिती दिली.कृषी विद्यापीठाची जागा उपलब्ध न झाल्यास बेलवंडी (ता. श्रीगाेंदे) येथे एमआयडीसीसाठी 600 एकर जागेची मागणी प्रस्तावित आहे.रेल्वेमार्ग लगतच असल्याने या जागेसंदर्भात डीआरडीओला विचारणा करावी, अशी सूचनाही विखे पाटील यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केली.संरक्षण साहित्यसामग्रीचा पहिला प्रकल्प शिर्डीत उभा राहिला आहे.त्याचे उद्घाटन 1 मे राेजी संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हाेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.