मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरच गिनीज आणि लिम्का बुकमध्ये

    26-Mar-2026
Total Views |
 

link 
 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुण्यादरम्यानच्या प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी हाेणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, हा प्रकल्प जागतिक स्तरावरही ओळखला जाणार आहे. आता लवकरच मिसिंग लिंक प्रकल्पाची नाेंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डसमध्ये हाेणार आहे.मिसिंग लिंकमध्ये 23.5 मीटर रुंदीचा जगातील सर्वांत रुंद बाेगदा बांधण्यात आला आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकी काैशल्याचा उत्तम नमुना असून, राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पाची नाेंद लिम्का आणि गिनीज बुकमध्ये करण्यासाठी दाेन्ही समित्यांकडे अर्ज केला आहे.मुंबई-पुणे प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई-पुणे अंतर अडीच ते तीन तासांत पार करणे साेपे झाले.
 
मात्र, आता या महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून, भविष्यात ती आणखी वाढणार आहे.वाढत्या वाहनसंख्येमुळे महामार्ग अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता महामार्गाची क्षमता वाढवून प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी एमएसआरडीसीने महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला.त्यानुसार एमएसआरडीसीने महामार्गावरील खाेपाेली कुसगावदरम्यान 13.3 कि.मी.ची आणि सुमारे 6695 काेटींची नवीन मार्गिका बांधण्याच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात केली. आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. आता प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, 1 मे राेजी मिसिंग लिंक सेवेत दाखल हाेणार आहे.
 
एमएसआरडीसीकडून या प्रकल्पाची नाेंद देश स्तरावर व्हावी यासाठी लिम्का बुक ऑफ रेकाॅर्ड्सच्या आणि जागतिक स्तरावर व्हावी यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्सच्या समितीकडे अर्ज केल्याची माहिती एमएसआरडीसीचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. मिसिंग लिंक प्रकल्पात जगातील सर्वांत रुंद असा बाेगदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळेया विक्रमाची नाेंद जागतिक आणि देश स्तरावर हाेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.आता या प्रकल्पाची पाहणी करण्यात येणार असून, पुढील प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाची नाेंद गिनीज बुक, लिम्का बुकमध्ये केली जाण्याची शक्यता आहे.असे झाल्यास राज्यासाठी ही बाब अभिमानाची ठरणार आहे.