मानसिकदृष्ट्या खंबीर व्य्नतींच्या काही चांगल्या सवयी

    26-Mar-2026
Total Views |
 

Health 
 
स्वतःचा सहवास आवडणे. आपण एकटे आहाेत म्हणून काळजी करत न बसता स्वतःचा सहवास आवडला पाहिजे. ज्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या खंबीर असतात त्या एकट्या असताना देखील स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलूंचा गुणांचा आणि अवगुणांचा विचार करतात आणि त्या दृष्टीने स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात. दुसरी गाेष्ट म्हणजे चुकीच्या लाेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले ठरते एकटे असल्यावर तुम्ही स्वतःच्या प्रगती विषयी विचार करू लागता.
 
 दुसऱ्यांच्या यशातून शिकणे. प्रत्येक वेळी स्वतः धडपडायचे, चुका करायच्या आणि शिकायचे असे न करता दुसऱ्यांच्या चुका दुसऱ्यांचे चांगले गुण याचा अभ्यास करून तसेच दुसऱ्या व्यक्तींना यश मिळण्यामागील कारणांचा अभ्यास करून ते गुण स्वतःमध्ये आत्मसात करून पुढे जाण्यात मानसिक दृष्ट्या खंबीर व्यक्ती कायम आघाडीवर असतात.त्या कधी तक्रार करत नाही किंवा स्वतःविषयी सहानुभूतीचे वातावरण तयार करण्याच्या भानगडीत पडत नाही. मानसिक दृष्ट्या खंबीर असणाऱ्या व्यक्ती नेहमीच स्वतःच्या चुका मान्य करतात. त्यांच्या दृष्टीने यश-अपयश हे आयुष्यातील चक्राचा एक भाग असते.
 
 चुकातून शिकण्याची त्यांची तयारी असते. याेग्य ते धडे घेऊन स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर त्यांचा भर असताे. आपल्याकडून काेणती चूक झाली, ती का झाली याचे विश्लेषण करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यावर त्यांचा भर असताे.
 
 नात्यांमध्ये निकाेप मर्यादा ठेवण्यावर मानसिक दृष्ट्या खंबीर व्यक्तींच्या भर असल्याचे कायम दिसून येते मग ही नाती वैयक्तिक आयुष्यातील असाे किंवा कामाच्या ठिकाणची असाे.
 
 सकारात्मक स्वसंवाद. अशा व्यक्ती कायम स्वतः च्या मनाशी सकारात्मक संवाद साधत असतात स्वतःमधील जमेच्या बाजू आणि स्वतः मधील त्रुटी अवगुण यांचा विचार करून समाेर येणाऱ्या समस्यांवर कशी मात करायची याची नियाेजन आणि व्यवरचना करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. मुख्य म्हणजे कुठलीही समस्या किंवा आव्हानांना काेण ताेंड देऊ शकेल याचा विचार करत बसण्यापेक्षा समस्या साेडवण्यात पुढाकार घेण्यात या व्यक्ती आघाडीवर असतात.
 
 कुतूहल मानसिकदृष्ट्या खंबीर व्यक्तींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनात विविध गाेष्टींविषयी परिसराविषयी, बदलांविषयी कायम कुतूहल जागृत असते. एखाद्या गाेष्टी मागील विविध मते दृष्टिकाेन जाणून घेण्याची त्यांची तयारी असते. त्यातून नवीन गाेष्टी शिकण्यावर त्यांचा भर असताे. त्यामुळेच एखादी गाेष्ट समजली नसेल तर ती माहिती करून घेणे, प्रश्न विचारणे याबाबत त्यांना कुठलाही संकाेच वाटत नाही.
 
 कठीण परिस्थितीत शांत राहणे हा देखील या व्यक्तींकडे एक माेठा गुण ठरताे. जेव्हा कठीण परिस्थिती असते आव्हाने उभे असतात तेव्हा सहकाऱ्यांशी वाद घालणे, भांडण करणे, मतभेद प्रदर्शित करणे यापासून ते आवर्जून लांब राहतात. अशा परिस्थितीमध्ये आरडाओरडा आणि नाैटंकी करण्यापेक्षा शांत राहून परिस्थितीवर काय मार्ग निघू शकेल, याबद्दल विचार करण्यावर त्यांचा भर असताे.