पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे निश्चितच औद्याेगिक विकासास मदत हाेणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक काेंडीतून सुटका हाेण्यासाठी महामार्गाची कामे हाेणे गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ हाेण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.तळेगाव-चाकण क्रमांक 548 डी राष्ट्रीय महामार्गावरील 0 ते 26 किमी.दरम्यान चाैपदरी उन्नत आणि चाैपदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे 26 ते 43 किमी. लांबीमध्ये चाैपदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाइन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्स्फर) पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्याेगिक वसाहतीतील वाहतूक काेंडी साेडवण्यासाठी मदत हाेणार आहे. त्यामुळे ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, राज्य पायाभूत सुविधाविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित हाेते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी बैठकीत या प्रकल्पांचे सादरीकरण केले.