सातपुड्यात 35 हजार वर्षांपूर्वीचे गुहाचित्र सापडल

    24-Mar-2026
Total Views |
 

satpuda 
 
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगांमधील शैलाश्रयांमध्ये मानवी इतिहासातील दुर्मीळ अशा भित्तिचित्रांचा ठेवा उजेडात आला आहे. या खडकांवरील चित्रांमध्ये चक्क शहामृग आणि आता नामशेष झालेल्या ‘सिवाथेरियम’ सारख्या प्राण्यांचे रेखाटन आढळले असून, ही चित्रे सुमारे 35 हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज संशाेधकांनी वर्तवला आहे. ‘कार्बन डेटिंग’द्वारे यावर शिक्कामाेर्तब झाले, तर हे देशातील आतापर्यंतचे सर्वांत जुने गुहाचित्र ठरू शकते.‘अंबादेवी’ समूहातील ‘मुंगसादेव’ या शैलाश्रयात ही महत्त्वपूर्ण चित्रे आढळून आली आहेत. संशाेधनानुसार,देशात 25 हजार ते 42 हजार वर्षांपूर्वी शहामृगाचे अस्तित्व हाेते. याचे पुरावे यापूर्वी मिळालेल्या अंड्याच्या कवचांवरून सिद्ध झाले आहे. मात्र, मुंगसादेव येथील चित्रात या पक्ष्याचे शरीर, लांब मान आणि पायांचे शरीरशास्त्रीय अचूक रेखाटन पाहता, त्या काळातील आदिमानवाने हा पक्षी प्रत्यक्ष पाहूनच रेखाटला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
 
या शैलाश्रयात केवळ शहामृगच नाही, तर रानकुत्र्यासारखे शिकारी प्राणी, बिबट्या, अस्वल, गेंडा आणि विविध प्रकारचे हरीण (बारशिंगा, सांबर, काळवीट) यांचीही चित्रे आहेत. ‘सिवाथेरियम’ या जिराफसदृश नामशेष प्राण्याचे आणि लांब ताेंडाच्या कीटकभक्षी प्राण्याचे चित्र हे या संशाेधनाचे माेठे आकर्षण ठरले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या संपूर्ण चित्रांच्या समूहात काेठेही मानवी आकृती, पाळीव प्राणी किंवा शिकारीची हत्यारे रेखाटलेली नाहीत. हे या चित्रांच्या प्राचीनत्वाचे लक्षण मानले जाते.देशात आतापर्यंत मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील चित्रांना सर्वांत जुने (सुमारे 10 हजार वर्षांपूर्वीचे- मेझाेलिथिक कालखंड) मानले जाते.
मात्र, अंबादेवी येथील ही चित्रे ‘अप्पर पॅलिओलिथिक’ कालखंडातील असून, ती ‘भीमबेटका’पेक्षा कितीतरी हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता संशाेधकांनी व्यक्त केली आहे.