जन्माला येताना काेणताही माणूस सर्वगुणसंपन्न हाेऊन येत नाही. रंगरूप व शरीर हे एवढेच ताे घेऊन येताे व पुढे माेठा हाेताना त्याला सर्व गुण प्रयत्न व कष्टानेच प्राप्त करून घ्यावे लागतात. संत असूनही श्रीसमर्थ दैववादी नाहीत हे त्यांचे अलाैकिकत्व आहे.प्रयत्नवादावर त्यांचा नितांत विश्वास आहे व प्रयत्न करून सामान्यातील सामान्य माणूसही गुणवान बनून असामान्य कर्तृत्व करू शकताे, ही त्यांची ठाम भूमिका आहे.त्यामुळेच आपले दाेष न जाणणारा, जाणल्यावरही ते टाकून गुणांची उपासना न करणारा; प्रयत्नांचा कंटाळा करून आळशी राहणारा माणूस त्यांच्या दृष्टीने दुर्दैवी, करंटा व हीन आहे. असा करंटाही याेगायाेगाने पश्चात्ताप पावून प्रयत्नाला लागला, तर त्याचे परिवर्तन हाेऊन ताे गुणवान हाेऊ शकताे हीही त्यांची अतूट श्रद्धा आहे. ‘‘करंटलक्षणनिरूपण’’ या तिसऱ्यासमासात ते अशा करंट्याचे अवगुण वर्णन करून त्यांचा त्याग करण्याचे आवाहन करीत आहेत.
या समासाचा प्रारंभ करताना ते म्हणतात, की मी श्राेत्यांना ही लक्षणे त्यागण्यासाठी सांगत असून, त्यांचा त्याग झाला, की आपाेआपच भाग्यलक्षणे प्राप्त हाेऊ लागतात. पापी आचरणामुळे दारिद्र्य येते आणि दारिद्र्यामुळे पाप घडते असा हा त्यांचा परस्परसंबंध आहे. करंट्याला कष्टांचा सतत कंटाळा असून, सुस्तपणा, झाेप व आळस यांचीच त्याला आवड असते. सद्बुद्धी व सत्कृत्यांचे वावडे असणाऱ्या त्या अभाग्याची वासना व इच्छा सतत पापाचरणाकडेच धांव घेत असते.भ्रमिष्ट व लहरी वागणाऱ्या अशांना बाष्फळ बडबड व बढाया मारण्याची सवय असते. लाेकांच्या मनातले समजून त्यांना रुचेल असे वागावे हे त्यांच्या कल्पनेतही न येता ते स्वैराचारी वागत राहतात.अतिहिशाेबीपणा नसावा; पण व्यवहारात हिशाेब ठेवता आले पाहिजेतच हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात - लेहाें नेणे वाचूं नेणे । सवदासुत घेऊं नेणे । हिशेब कितेब राखाें नेणे । धारणा नाही ।।6।।